Sanitation campaign organized by CISF and CRPF personnel | सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी राबवली स्वच्छता मोहीम
सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनी राबवली स्वच्छता मोहीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेला बळ देण्यासाठी विविध सरकारी संस्थांतर्फे शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सीआयएसएफ, नौदल, तटरक्षक दल व मुंबई विमानतळातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)तर्फे शनिवारी जुहू किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये सीआयएसएफच्या पश्चिम विभागाच्या महानिरीक्षक मीनाक्षी शर्मा, वरिष्ठ कमांडंट क्षिप्रा श्रीवास्तव यांच्यासहित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सीआयएसएफचे ७०० जवान व सीआरपीएफच्या २०० जवानांनी यामध्ये सहभागी होऊन जुहू किनारपट्टी स्वच्छ केली.

तटरक्षक दलातर्फे दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राज्यात डहाणू, मुरुड जंजिरा, रत्नागिरी; कर्नाटकमध्ये मेंगळुरू व कारवारमध्ये; केरळमध्ये कोच्ची व इतर ठिकाणी; लक्षद्वीपमध्ये आणि दमण व गोव्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. दादर चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेमध्ये तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर यांनी व इतर अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी आर.के. सिंह यांनी दिली.

‘प्लॅस्टिक से रक्षा-स्वच्छता ही सुरक्षा’ याप्रमाणे कार्यवाही करण्याचा संदेश तटरक्षक दलाने दिला आहे. सध्या समुद्रात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो; परिणामी, समुद्राचे रूपांतर डम्पिंग ग्राउंडमध्ये होत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर विविध ठिकाणी केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये २,२४३ जणांनी सहभाग घेतला. या वेळी सुमारे ३ हजार किलो कचरा जमा करण्यात आला.

मुंबई विमानतळामध्ये स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून विमानतळावर स्वच्छ भारत गाणे स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येत आहे. स्वच्छता या थीमवर अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये विमानतळावरील कर्मचाºयांना सहभागी करून घेण्यात येत आहे. तंबाखू खाण्याच्या दुष्परिणामांबाबत प्रवासी व कर्मचाºयांना माहिती दिली जात आहे.
स्वच्छतेबाबत निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वच्छतेचा संदेश

राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे सुमारे २ हजार विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवल्याची माहिती नौदलाचे जनसंपर्क अधिकारी कमांडर मेहुल कर्णिक यांनी दिली. गिरगाव चौपाटीवरील प्लास्टीक व इतर कचरा गोळा करताना विद्यार्थ्यांना पाहून उपस्थितांना स्वच्छतेचा संदेश न सांगता मिळाला.

Web Title: Sanitation campaign organized by CISF and CRPF personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.