Join us

आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 07:13 IST

दरम्यान, सोमवारी सकाळी वानखेडे यांनी केलेले ट्विट चर्चेत होते.

मुंबई : आर्यन खानला एनसीबीने क्लीन चिट दिल्याच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांची केंद्रीय महसूल सेवा मंत्रालयाने चेन्नई येथे बदली केली आहे. केंद्रीय करदाते सेवा संचालनालयामध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय महसूल मंत्रालयाअंतर्गत करदाते सेवा विभाग काम करतो. हा तुलनेने कमी महत्त्वाचा विभाग मानला जातो. २००८च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करताना त्यांना हे साइड पोस्टिंग दिल्याचे बोलले जाते.

दरम्यान, सोमवारी सकाळी वानखेडे यांनी केलेले ट्विट चर्चेत होते. मी एखाद्या नकारात्मक गोष्टींवर अडकून पडत नाही. यामुळे प्रगती खुंटते.  पुढे जाण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार करावा, असे वानखेडे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. आर्यन खान प्रकरणामध्ये सदोष तपास केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच याच अनुषंगाने त्यांची विभागीय चौकशीदेखील सुरू आहे. याखेरीज नवाब मलिक यांनी वानखेडे यांनी जातीचा खोटा दाखला दिल्याचा आरोप केला होता. त्याची केंद्रीय महसूल खात्यातर्फे चौकशी सुरू आहे.

टॅग्स :समीर वानखेडेचेन्नई