Join us

Sambhaji Raje: आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 18:43 IST

छत्रपती संभाजीराजे मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून ते आमरण उपोषणाला बसले आहेत. संभाजीराजेंच्या या उपोषणाला मराठा समाजासह अनेक युवकांचा पाठिंबा वाढत आहे. सोशल मीडियावर कालपासून संभाजीराजेंचे मुंबईच्या आझाद मैदानावरील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडिओंसह कॅप्शन लिहून हे शेअर होताना दिसत आहे. 

छत्रपती संभाजीराजे मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी... अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं, त्या गादीचे वारसदार आज आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसल्याने अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्ध परिस्थितीतही रशियात असलेल्या मराठा युवकांनी थेट रशियातून संभाजीरांजेंच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. एका व्हिडिओतून या युवकांनी एक मराठा, लाख मराठा ही घोषणा दिली. तसेच, संभाजीराजेंच्या आंदोलनास आम्ही पाठिंबा देतो, सर्व समाजबांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, अशी विनंतीही या युवकांनी केली आहे.  

संभाजीराजेंच्या आंदोलनात भाजपानेही पाठिंबा दिला आहे. संभाजीराजेंच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजपा पूर्ण पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात सांगितले. मराठा समाजासाठी भाजपाच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजपा असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल. 

'मी महाराजांचा वंशज, हा लढा मी लढायलाच हवा'

मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. अनेक आंदोलने केली. सरकारकडे मागण्या दिल्या. पण सरकारने शब्द पाळला नाही. शब्द न पाळल्याने मला दुसरा पर्याय राहिला नाही. मी जी चळवळ सुरू केली. त्यात समाज वेठीस धरला जाऊ नये म्हणून मी आमरण उपोषण सुरू केले आहे. 17 जूनला ज्या मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही. पण सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

टॅग्स :रशियासंभाजी राजे छत्रपतीयुक्रेन आणि रशियामराठा आरक्षण