Sambhaji Raje Chhatrapati Meets Devendra Fadnavis: “...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटलो”; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 17:58 IST2022-05-10T17:55:30+5:302022-05-10T17:58:23+5:30
Sambhaji Raje Chhatrapati Meets Devendra Fadnavis: दोन राजकीय व्यक्ती भेटल्यानंतर त्यांच्यात राजकीय चर्चा होणारच, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

Sambhaji Raje Chhatrapati Meets Devendra Fadnavis: “...म्हणून देवेंद्र फडणवीस यांना भेटलो”; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितले
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. हा कार्यकाळ संपताच आगामी राजकीय वाटचालीबाबत लवकरच घोषणा करणार आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली होती. यातच आता संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची त्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर भेट घेतली. यानंतर या भेटीचे कारण खुद्द संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी खासदारपदासाठी संधी दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खासदारकीची संधी मिळाली असल्याचेही ते म्हणाले. माझा राज्यसभा खासदारपदाचा कार्यकाळ संपला आहे. ज्यांनी मला संधी दिली ते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी भेट घेतली आहे. त्यांच्यामुळे मला गडकिल्ल्यांचे काम करता आले म्हणून आभार व्यक्त केले, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
दोन राजकीय व्यक्ती भेटल्यानंतर राजकीय चर्चा होणारच
दोन राजकीय व्यक्ती भेटल्यानंतर त्यांच्यात राजकीय चर्चा होणारच. ओबीसी आरक्षणासाठी कोर्टाच्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते सर्वांसाठी होते. केवळ मराठ्यांशी नव्हते, शाहू महाराजांनीही आरक्षण बहुजनांना दिले. त्यामुळे मीही बहुजनांसाठी आणि मराठ्यांनाआरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजकारणात प्रवेश करणार असल्याचे निश्चित असल्याचे संभाजीराजे म्हणाले. याबाबत १२ तारखेला भूमिका स्पष्ट करणार आहे. पुढे काय करायचे हे माझ्या डोक्यात ठरलेले आहे. ते १२ तारखेला जाहीर करणार असल्याचा पुनरुच्चार संभाजीराजे यांनी केला. भाजपच्या शिफारसीवरुन ११ जून २०१६ रोजी राष्ट्रपती कोट्यातून संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभा खासदार झाले होते. त्यांच्या खासदारकीचा कार्यकाळ अलीकडेच संपला.