समय रैना अडचणीत; ३० जणांना मुंबई पोलिसांचे समन्स, युट्यूबलाही पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:14 IST2025-02-12T17:12:36+5:302025-02-12T17:14:58+5:30
India's Got Latent: रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांच्या विधानामुळे समय रैनाही अडचणीत आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आता शो मध्ये आलेल्या ३० जणांना समन्स बजावण्यात आले आहे.

समय रैना अडचणीत; ३० जणांना मुंबई पोलिसांचे समन्स, युट्यूबलाही पत्र
Ranveer Allahbadia and Samay Raina: युट्यूबवरील इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या विधानाने समय रैनाच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांसह सायबर पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रणवीरच्या विधानानंतर या शोमध्ये इतर युट्यूबर्संनी केलेली विधानेही व्हायरल होत आहेत. अशात आता पोलिसांनी या शो मध्ये गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या ३० जणांना समन्स बजावले आहे. तर अपूर्वा मखीजा हिची आज पोलिसांनी चौकशी केली. महत्त्वाचं म्हणजे १८ पैकी ज्या एपिसोडमध्ये अश्लाघ्य विधाने आढळली आहेत, ती डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात सायबर पोलिसांनी युट्यूबला पत्र पाठवले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सायबर सेल पोलिसांनी सांगितले की, आम्ही शोच्या सर्व एपिसोडची तपासणी करत आहोत. १८ एपिसोडमध्ये जे लोक गेस्ट म्हणून सहभागी झाले आणि त्यांच्यापैकी ज्यांनी अश्लाघ्य भाषेचा वापरली, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. त्याचबरोबर या शोला उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचेही जबाब नोंदवण्यात येतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सायबर सेलने युट्यूबला पत्र पाठवले आहे. ज्या एपिसोडमध्ये अश्लाघ्य भाषा वापरण्यात आली आहे. ते एपिसोड डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे.
३० जणांना समन्स, अपूर्वा मखीजाचा नोंदवला जबाब
इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये सहभागी झालेल्या गेस्ट पैकी आतापर्यंत ३० जणांना समन्स पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपूर्वी मखीजाची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. अपूर्वा मखीजा तिच्या वकिलासह मुंबईतील खार पोलीस ठाण्यात हजर झाली होती. पोलिसांनी मखीजाचा जबाब नोंदवून घेतला.
दरम्यान, रणवीर अलाहाबादिया याला राष्ट्रीय महिला आयोगाने आता १७ फेब्रुवारी रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. शोचा निर्माता तुषार पुजारी आणि सौरभ बोथरा यानांही आयोगाने नोटीस बजावली आहे.