Join us  

Sharad Pawar: 'शरद पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम', मनसेच्या प्रवक्त्याचं हात जोडून नमन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 6:08 PM

शरद पवार यांची प्रकृती दिवाळीच्या पाडव्यानंतर बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या आजारपणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, शरद पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरासाठी उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. पवारांच्या या सहभागाचे आणि उपस्थितीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनाही शरद पवारांमधील या ऊर्जेचं कौतुक वाटत आहे.

शरद पवार यांची प्रकृती दिवाळीच्या पाडव्यानंतर बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळातील त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर शिर्डी येथे आयोजित करण्यात आलं होतं. आता, या शिबिराला शरद पवार उपस्थित राहतील की नाही, याबाबत तर्क-वितर्क होते. मात्र, रुग्णालयातून शिर्डीला येत आणि पुन्हा शिर्डीतून रुग्णालयात जाऊन शरद पवारांनी पुन्हा एकदा पावसाच्या सभेची आठवण करुन दिली. शरद पवारांची ही ऊर्जा पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही अप्रुप वाटू लागलं. सोशल मीडियावरही त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबईतील नेते गजानन काळे यांनी ट्विट करुन शरद पवारांचा फोटो शेअर केला आहे.  

राजकारण आपल्या जागेवर, पण या इच्छाशक्तीला सलाम असे म्हणत गजानन काळे यांनी प्रेमाचं चिन्ह दिलं आहे. त्यामुळे, राजकीय विरोधक असतानाही शरद पवारांची या वयातील आणि गंभीर आजार सोबत घेऊनही प्रबळ इच्छाशक्ती वारंवार दिसून येते, त्याला सलाम केला जातोय. 

जितेंद्र आव्हाड यांचीही भावूक पोस्ट

आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत राजकारण करायच असतं आणि त्या प्रतिकूल परिस्थितीची दिशा बदलून ती आपल्या दिशेने वळवायची आणि त्यावरुन मार्गक्रमण करुन त्याच्यावर विजय प्राप्त करायचा हा त्यांचा स्थायी स्वभाव. आजही तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले. त्यांच्या इच्छाशक्तीला सलामच करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहेत. राजकारण हे सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत करण्याचा विषय नाही. तर सकाळी ७ ते दुस-या दिवशी सकाळी ७ म्हणजे २४ तास ३६५ दिवस करण्याचा विषय आहे हे त्यांच्या क्रियेतून ते दाखवतात, असेही आव्हाड यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.

टॅग्स :शरद पवारमनसेराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसहॉस्पिटल