बिष्नोई टोळीकडून धमकी प्रकरणी बंदुकीच्या परवान्यासाठी सलमान खान आयुक्तांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 06:19 IST2022-07-23T06:17:03+5:302022-07-23T06:19:21+5:30
गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर गेल्या महिन्यात सलमानला धमकीचे पत्र आले होते.

बिष्नोई टोळीकडून धमकी प्रकरणी बंदुकीच्या परवान्यासाठी सलमान खान आयुक्तांच्या भेटीला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बिष्नोई टोळीकडून आलेल्या धमकी प्रकरणानंतर सिनेअभिनेता सलमान खान याने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना देण्याची मागणी केली.
गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर गेल्या महिन्यात सलमानला धमकीचे पत्र आले होते. चौकशीत आरोपी लॉरेन्स बिष्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड यानेच हे धमकीचे पत्र सलमानचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचविल्याची माहिती समोर आली.
सलमानने दुपारी चारच्या सुमारास नवनियुक्त पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. यादरम्यान त्याने धमकीच्या पत्राचाही उल्लेख केला. त्यानंतर बंदुकीचा परवाना मिळवण्यासंदर्भात अर्ज दिला. स्वत:च्या सुरक्षेसाठी त्याने बंदूक बाळगण्यासाठी परवानगी मागितली आहे. आयुक्तांबरोबरच सलमानने सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांचीदेखील भेट
घेतली.