Join us

सलमानच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या कॅडबरी गर्लचा असा आहे सफरनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 19:12 IST

''मुझे लडकी मिल गयी'', असे ट्विट करत बॉलिवूडमधील दबंग सलमान खाननं मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) कोट्यवधी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती.

मुंबई - ''मुझे लडकी मिल गयी'', असे ट्विट करत बॉलिवूडमधील दबंग सलमान खाननं मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) कोट्यवधी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. या ट्विटमुळे सलमान कान लग्नबेडीत अडकतोय की काय?, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, या ट्विटमागील गुपित अखेर दोन तासांनी स्वतः सलमाननंच फोडले. सलमानला भेटलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याचा आगामी सिनेमा 'लवरात्री' सिनेमातील हिरोईन आहे.  तिचं नाव वरीना असे आहे.  आयुष शर्मा दिग्दर्शित सिनेमामध्ये सलमान व वरीना मुख्य भूमिकेत असणार आहेत. 

सलमान खान आणि आयुष शर्माच्या नात्याबाबत सर्वांना माहिती आहे, मात्र वरीना कोण आहे याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. नुकतेच प्रसारित करण्यात आलेल्या कॅडबरी सिल्क चॉकलेटच्या जाहिरातीत वरीना चमकली होती. सलमाननं ही जाहिरात पाहून आयुष शर्मांसोबत बोलणी करुन तिला आगामी सिनेमामध्ये काम करण्याची ऑफर दिली. मिळालेल्या माहितीनुसार, न्यू-यॉर्क फिल्म अकॅडमीमधून वरीनानं आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. ती आता 23 वर्षांची असून तिची आई अफगाणी आणि वडील इराणी आहे. लहान वयातच तिनं मॉडेलिंग सुरू केले होते. मायानगरी मुंबईत आलेल्या वरीनानं 2013मध्ये दिल्लीतून  मॉडेलिंग करिअला सुरुवात केली. सुप्रसिद्ध ब्रॅन्ड्ससोबत वरीनानं कित्येक जाहिरातीही केल्या आहेत.  

आयुष शर्मा यांच्या आगामी सिनेमामध्ये सलमान खान दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीचा शोध सुरू होता. कित्येक बड्या अभिनेत्रींची नावंदेखील सुचवण्यात आली होती, मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही. अखेर सलमाननं आपल्या आगामी सिनेमासाठी वरीनाच्या नावाला पसंती दर्शवली आहे. आयुष शर्मा यांच्या 'लवरात्री' या आगामी सिनेमामध्ये वरीना झळकणार आहे.  

 

 

टॅग्स :सलमान खानकरमणूकबॉलीवूड