हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 09:04 IST2026-01-11T09:03:25+5:302026-01-11T09:04:49+5:30
सर्वाधिक २५ गुन्ह्यांची नोंद, अनेकांच्या भुवया उंचावल्या

हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
मुंबई : खंडणी, मारामारी, अपहरण, हत्येचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे नोंद असलेल्या शहजादा याकूब मलिक ऊर्फ सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून (अजित पवार) थेट उमेदवारी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे उद्धवसेनेच्या आमदारांच्या छत्रछायेखाली असलेला मलिक १०९ मधून आग्रही असल्याचे समजते. मात्र त्याला उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याने त्याने राष्ट्रवादी (अजित पवार) वाट धरली. मुंबईतील इतर उमेदवारांपैकी त्याच्यावर सर्वाधिक २५ गुन्हे नोंद आहेत.
भांडुप खिंडीपाडा येथील रहिवासी असलेला सज्जू मलिक याच्यावर मुलुंड, भांडुप, कांजूर पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे नोंद आहेत. १०९ हा प्रभाग उद्धवसेनेचा गड मानला जातो. गेल्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या दीपाली गोसावी या ८,७०७ मतांनी निवडून आल्या. मलिकने राष्ट्रवादी (अजित पवार) कडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. माझ्या विरुद्ध गुन्हे आहेत पण, व्हाइट कॉलर गुन्हेगारांचे काय? ते खुलेआम जनला फसवतात. राजकीय दबावातून माझ्यावर गुन्हे दाखल झाले, ते अद्याप सिद्ध झाले नसल्याचे मलिकने सांगितले.
अन्य उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुलुंडमध्ये भाजपचे माजी नगरसेवक व यंदा प्रभाग १०६ मधून पुन्हा रिंगणात उतरलेले प्रभाकर शिंदे यांच्याविरोधात सहा गुन्हे प्रलंबित आहेत.
प्रभाग क्र. १०४ येथून अपक्ष लढणारे पंकज चंदनशिवे यांच्याविरोधात चार तर रिपाइं (आठवले) गटाचे उमेदवार विनोद जाधव यांच्याविरोधात दोन गुन्हे प्रलंबित आहेत.
गुन्ह्यात शिक्षाही
प्रभाक क्र. ९३ मधून रिपाइं (आठवले) गटाचे उमेदवार सचिन कासारे यांच्याविरोधात तीन गुन्हे प्रलंबित आहेत. प्रभाग २५ मधून उद्धवसेनेचे उमेदवार हरी शास्त्री यांच्याविरोधात तीन गुहे नोंद असून, दोन गुन्ह्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. याच प्रभागातून अपक्ष लढणाऱ्या चंद्रशेखर वायंगणकर यांना दोन गुन्ह्यांत शिक्षा झाली आहे.