बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान प्रकरणात छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संशयित आकाश कनौजियाने मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. आकाशने गृह मंत्रालयाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करून १ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. सैफ अली खान प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्टेशनवरून अटक केली.
आकाशने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चुकीमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्याचं लग्न मोडलं आणि त्याचे नातेवाईकही त्यांच्यापासून दूर गेले, नातेवाईकांनी कुटुंबीयांशी बोलणं बंद केलं. यामुळे खूप मानसिक त्रास झाला आहे. याआधी देखील आकाशने सैफ अली खान प्रकरणात केलेल्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली होती. पोलिसांनी जरी त्याला सोडलं असलं तरी याचा त्याच्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम झाल्याचं म्हटलं आहे.
"मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"
सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी रात्री चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. उपचारानंतर आता अभिनेत्याची प्रकृती ठीक आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून आकाश कनौजियाला ताब्यात घेतलं. या घटनेनंतर आकाशच्या वडिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं म्हटलं होतं.
"नोकरी गेली आणि लग्नही मोडलं"
"मुंबई पोलिसांनी माझ्या मुलाला त्याची ओळख पटवल्याशिवाय ताब्यात घेतलं. या चुकीमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आता आकाश मानसिक आघातामुळे कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि तो त्याच्या कुटुंबाशी जास्त बोलत नाही. त्याची नोकरी गेली आणि त्याचं लग्नही मोडलं. याला जबाबदार कोण? पोलिसांमुळे आकाशचं भविष्य उद्ध्वस्त झालं आहे" असं कैलाश कनौजिया म्हणाले होते.