मुंबई :महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५ ते ३० या पंचवार्षिक निवडणुकीकरिता राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर व ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’चे २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले, अशी माहिती भाजप गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र सहकारी संघ शिक्षण-प्रशिक्षण देणारी संस्था आहे. राज्य सहकारी संघाची निवडणूक २०२५-३० करिता २७ जुलै रोजी पार पडणार आहे. ही निवडणूक मी तसेच राज्य सहकारी मजूर संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर, शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल म्हणून सामोरे जात आहोत. निवडणुकीत २१ जागा असून त्यांपैकी आमच्या पॅनेलच्या ९ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. इतर संस्था मतदारसंघात पाच जागांसाठी निवडणूक होते आहे. त्यामध्ये नंदकुमार काटकर, या पॅनेलचे नेतृत्व करणारे संजीव कुसाळकर, सुनील पाटील (सांगली), नितीन बनकर, सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष रामदास मोरे, अर्जुनराव बोबडे (ओबीसी, अहिल्यानगर), धनंजय शेडगे (कोल्हापूर), वसंत पाटील (नागपूर), प्रकाश भिशीकर (नागपूर), अशोक जगताप हे निवडणूक लढवत आहेत. आमच्या पॅनेलची निशाणी कपबशी आहे. एकूण नऊ मतदान केंद्रांवर निवडणूक होणार आहे, अशी माहिती दरेकरांनी दिली.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवारआमदार प्रवीण दरेकर (मुंबई मतदार संघ), अनिल गजरे (भटक्या विमुक्त जाती-जमाती), विष्णू घुमरे (राखीव मतदार संघ), हिरामण सातकर (पुणे मतदारसंघ), प्रकाश दरेकर (राज्यस्तरीय मतदारसंघ), गुलाबराव मगर (मराठवाडा विभाग मतदारसंघ), अरुण पानसरे (कोकण विभाग मतदारसंघ), जयश्री पांचाळ (महिला राखीव मतदार संघ), दीपश्री नलावडे (महिला राखीव मतदार संघ).