करी रोड, चिंचपोकळी पुलांची सुरक्षा धोक्यात? वाहतुकीचा वाढता ताण; तज्ज्ञांनी वर्तवली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 14:10 IST2025-10-13T14:10:49+5:302025-10-13T14:10:57+5:30
दादर ते भायखळादरम्यान पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी करी रोड आणि चिंचपोकळी पूल आहेत. हे पूल मध्य रेल्वे मार्गांवरून जात असून, ते जीर्ण झाल्याने देखभालीची आवश्यकता आहे.

करी रोड, चिंचपोकळी पुलांची सुरक्षा धोक्यात? वाहतुकीचा वाढता ताण; तज्ज्ञांनी वर्तवली भीती
महेश कोले -
मुंबई : प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने तेथील वाहतुकीचा सर्वाधिक ताण आता करी रोड आणि चिंचपोकळी या जुन्या पुलांवर येत आहे. अवजड वाहनांची वाढती वर्दळ आणि दीर्घकाळ पुलांवर थांबणारी वाहने, यामुळे कोंडीच वाढत नाही, तर पुलांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दादर ते भायखळादरम्यान पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी करी रोड आणि चिंचपोकळी पूल आहेत. हे पूल मध्य रेल्वे मार्गांवरून जात असून, ते जीर्ण झाल्याने देखभालीची आवश्यकता आहे. पुलांवरून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असली तरी त्याचे काटेकोर पालन होत नाही. एसटी, बेस्टच्या बस तसेच खासगी ट्रक या पुलांवरून जात असल्याने पुलावर कंपन वाढले आहे.
वाहनांच्या रांगा
प्रभादेवी पूल बंद असल्याने एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग, सेनापती बापट मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. सकाळ-सायंकाळी येथे वाहनांच्या रांगा लागतात. कार्यालयीन वेळेत नोकदार, रहिवासी, विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोंडी, प्रदूषणाचाही फटका
लोअर परळ, लालबाग, करी रोड, चिंचपोकळी आणि आर्थर रोड परिसरातील वाहने महालक्ष्मी, वरळी आणि कोस्टल रोडकडे जाण्यासाठी गणपतराव कदम मार्ग व संत गाडगे महाराज चौक मार्गाचा वापर करतात. या परिसरात व्यावसायिक केंद्रे असल्याने आधीच वाहतुकीचा ताण मोठा आहे.
आता प्रभादेवी पूल बंद झाल्याने वाहतूक पूर्णपणे करी रोड, चिंचपोकळी आणि लोअर परळ पुलांवरून वळविली आहे, परिणामी या भागातील रहिवाशांना दररोज कोंडीचा आणि प्रदूषणाचा फटका बसत आहे.