Join us

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितांना दिलासा, मोक्कातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 18:34 IST

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे.

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिकर आणि लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांना दिलासा मिळाला आहे. विशेष एनआयए न्यायालयाने पाचजणांवरील मोक्का हटवला आहे. या सर्वांवर आता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालणार आहे. सोबतच शिवनारायण कालसंग्राही, श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी या तिन्ही आरोपींना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं आहे. 15 जानेवारी 2018 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 

साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांनी  राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आम्हाला आरोपमुक्त करावे अशी मागणी करणारी याचिका केली होती. न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. मात्र अंशत: दिलासा देत कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, समीर कुलकर्णी, अजय राहिकर, रमेश उपाध्याय यांना ‘मोक्का’ कलमातून मुक्त केले. या सर्वांविरोधात आता मोक्काअंतर्गत खटला चालणार नाही.  अन्य आरोपींची आरोपमुक्त करण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रे या दोन अन्य आरोपींवर शस्त्रास्त्र कायद्याखाली खटला चालणार आहे.

न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्ट केलं की, बॉम्बस्फोटातील दुचाकीचा वापर कशासाठी होणार याची साध्वी प्रज्ञाला कल्पना होती, त्यामुळे साध्वी प्रज्ञाची कटाच्या आरोपातून मुक्त करता येणार नाही. 

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.

टॅग्स :मालेगाव बॉम्बस्फोटस्फोटराष्ट्रीय तपास यंत्रणा