Join us  

Sachin Vaze: "अनिल देशमुखांनी २ कोटी, तर अनिल परब यांनी ५० कोटींची केली होती मागणी"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 4:30 AM

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटी, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका कंपनीकडून ५० कोटी, तर मुंबईच्या ५० ठेकेदारांकडून २ कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असा सनसनाटी आरोप वाझेने केला आहे.

मुंबई : महिन्याला १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटबाबत  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर आता यातील मुख्य साक्षीदार असलेल्या  सचिन वाझेने नवीन ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ कोटी, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एका कंपनीकडून ५० कोटी, तर मुंबईच्या ५० ठेकेदारांकडून २ कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असा सनसनाटी आरोप वाझेने केला आहे. एनआयए कोर्टाला उद्देशून स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या कथित पत्रात त्याने हा दावा केला आहे. मात्र कोर्टात हे पत्र सादर केलेले नाही.एनआयएच्या  कोठडीत असलेल्या वाझेने इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात ३ एप्रिलची तारीख आहे. त्याची प्रत ‘लोकमत’ला मिळाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर देशमुख यांनी मला फोन करून  शरद पवार  यांनी तुम्हाला निलंबित करण्यास सांगितले आहे, त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी २ कोटींची मागणी केली. त्यावर आपल्याला शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पैसे नंतर देण्यास सांगितले. पुन्हा जानेवारीत भेटलो असताना त्यांचा पीए कुंदन याने १,६५० बारमधून प्रत्येकी ३ ते ३.५० लाख दर महिन्याला मिळवून देण्यास सांगितले. त्यालाही आपण नकार दिला. परब यांनी जुलै/ऑगस्टमध्ये आपल्याला बोलावून ‘एसबीयूटी’ची  चौकशी सुरू करून ५० कोटींची मागणी करण्यास सांगितले. ते शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा या वर्षी जानेवारीत बोलावून मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेल्या ५० ठेकेदारांची चौकशी पुन्हा सुरू करण्यास सांगून त्यांच्याकडून २ कोटी वसूल करण्याची सूचना केली होती; पण त्यालाही आपण नकार दिला होता आणि ही बाब आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून सांगितली होती. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती त्यांना बोलून दाखवल्यावर त्यांनी आपल्याला काम करत राहण्याची सूचना केली होती.”वाझेचे हे खळबळजनक पत्र कोर्टाने न  स्वीकारता हा जबाब विहित नमुन्यात द्यावा  किंवा ‘कन्फेक्शन’ देण्यास सांगितले. मात्र वाझे तशा स्वरूपात देण्यास तयार नाही, त्यामुळे आजही पत्र कोर्टात सादर करण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.वाझेच्या या तीन पानी पत्रातील आरोप मंत्री परब व देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. जाणिवपूर्वक बदनामीसाठी असले आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :सचिन वाझेअनिल परबअनिल देशमुख