मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी सचिन तेंडुलकरची जोरदार 'बॅटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 12:24 IST2018-03-07T12:22:09+5:302018-03-07T12:24:19+5:30
मुंबईकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करून त्रास कमी करण्यासाठी भारताचा महान क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने पुढाकार घेतला आहे.

मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी सचिन तेंडुलकरची जोरदार 'बॅटिंग'
मुंबई - मुंबईत उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांचा हा प्रवास अधिक सुखकर करून त्रास कमी करण्यासाठी भारताचा महान क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने पुढाकार घेतला आहे. सचिनने मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एकत्रिकरण करण्याची मागणी केली आहे. सचिनने केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून त्यांच्यासमोर एकत्रिकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे.
मी जो प्रस्ताव ठेवलाय त्याच्या अंमलबजावणीत अडथळे असले तरी तुम्ही माझ्या मागणीला पाठिंबा द्याल याची मला खात्री आहे. उपनगरीय लोकल सेवेचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन व्हावे यासाठी सचिनने ही मागणी केली आहे. उपनगरीय लोकल सेवा मुंबईकरांची जीवनवाहिनी असून दररोज 75 लाख नागरिक लोकलने प्रवास करतात.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी सचिनने केली आहे. या महामंडळाला स्वायत्ता देण्यात यावी, भारतीय रेल्वेच्या नियंत्रणाखाली त्यांचा कारभार नसावा असे सचिनने पत्रात म्हटले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एकत्रिकरण झाल्यास निर्णयप्रक्रियेला वेग येईल तसेच नागरी सुविधेचे अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागतील असे सचिनने म्हणणे आहे.
11 डिसेंबर 2015 रोजी राज्यसभेत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सचिनच्या रेल्वे संबंधीच्या या प्रश्नाला उत्तर दिले होते. सचिनचा हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.