सावंतांच्या पत्नीने नेलपेंट रिमूव्हरने शाई पुसून दाखवली; प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओच प्रसिद्ध केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 06:26 IST2026-01-16T06:25:38+5:302026-01-16T06:26:00+5:30
शाईऐवजी मतदान केंद्रात मार्कर पेनचा वापर

सावंतांच्या पत्नीने नेलपेंट रिमूव्हरने शाई पुसून दाखवली; प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओच प्रसिद्ध केला
मुंबई : मतदानानंतर लावण्यात आलेली शाई पुसली जाते. नेलपेंट रिमूव्हर किंवा तत्सम रसायनाने ती निघाली, असे दावे गुरुवारी करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, तर त्यांच्या बोटाला लावण्यात आलेली शाई कशी पुसली गेली, याचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओच प्रसिद्ध केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही शाईवरून आयोगावर टीका केली.
नेलपेंट रिमूव्हरने शाई पुसली जात आहे, असे माझ्या पत्नीने मला सांगितले. तो प्रयोग मी करून पहिला आणि त्यात तथ्य आढळले, असे सावंत म्हणाले. शाईऐवजी मतदान केंद्रात मार्कर पेनचा वापर करण्यात आला, असा दावाही त्यांनी केला. महापालिकेतील कामगार नेते संजय कांबळे बापेरकर यांनीही शाई पुसली गेल्याचा दावा केला. मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जाते, अशा अनेक तक्रारी आल्या पण निवडणूक आयोग ढिम्म राहिले, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.