Join us  

भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा सचिन अहिरांचा आरोप, Video केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 1:26 PM

Rahul Deshpande News: मुंबईतील जांबोरी मैदानात भाजपाकडून मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे

मुंबई - भारतीय जनता पक्षाने दहीहंडी आणि नवरात्रीपाठोपाठ मुंबईत दिवाळीही जोरदार साजरी करण्याची तयारी केली आहे. मुंबईतील जांबोरी मैदानात भाजपाकडून मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे. अहिर यांना या घटनेचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. मात्र भाजपा नेते आशिष शेलार यांनी अहिर यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.

भाजपाच्या या मराठमोळ्या दीपोत्सवामध्ये राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम होता. दरम्यान, सचिन अहिर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल देशपांडे हे गायनासाठी मंचावर बसलेले दिसत आहेत. त्याचदरम्यान, तिथे टायगर श्रॉफचं आगमन होतं. त्याला घेऊन भाजपा नेते मंचावर येतात. त्यावेळी सूत्रसंचालक पुष्कर श्रोती य़ांच्याकडून पाच मिनिटांचा ब्रेक घेण्याची घोषणा होते. मात्र या प्रकारामुळे राहुल देशपांडे संतप्त होतात. एक मिनिटाचा जरी ब्रेक घेतला तरी मी गाणार नाही, असं त्यांना सांगा, त्यांना म्हणावं २० मिनिटं थांबा, मी माझं गाणं संपवतो, मग तुम्हाला काय करायचे ते करा, मला हे आधी सांगितलं गेलं पाहिजे होतं, उठू मी? असं ते सूत्रसंचालकांना सांगताना दिसत आहेत.

या गडबडीतच भाजपा नेते राहुल नार्वेकर हे टायगर श्रॉफचा मंचावर छोटेखानी सत्कार करताना दिसत आहेत, हा व्हिडीओ सचिन अहिर यांनी शेअर केला असून, हाच का मराठी कलाकारांचा सन्मान? भाजपाने आयोजिक केलेल्या मराठी सन्मानाचा, आपला मराठमोळा दीपोत्सव, जांबोरी मैदान, वरळी येथील कार्यक्रमात मराठी कलाकारांची चेष्टा करण्यात आली, असा आरोप ट्विटरवरून केला आहे. तसेच याबाबत दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली आहे.

सचिन अहिर यांनी राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा केलेला दावा भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी फेटाळून लावला आहे. मराठी माणसाच्या मराठी दीपोत्सवात सिनेसृष्टीमधील कलाकार येत आहेत, हा मराठी माणसाचा सन्मानच आहे. मराठी माणसाचा सन्मान होतोय आणि तो भाजपाकडून होतोय, म्हणून सचिन अहिर यांची कोल्हेकुई सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :राहुल देशपांडेमुंबईभाजपासचिन अहिरआशीष शेलार