तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:45 IST2025-10-29T07:44:58+5:302025-10-29T07:45:50+5:30
चाकणकरांनी आयोगाची इभ्रत राखावी असा सल्लाही सुषमा अंधारे यांनी दिला.

तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
मुंबई : पीडितेला न्याय मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करत आहेत, असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लक्ष घालून जबाबदार माणसाला आयोगावर नेमावे आणि आयोगाची इभ्रत राखावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी मुंबईत मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत मृत डॉक्टर युवतीचे चारित्र्यहनन केले. ती युवती कितीजणांशी मोबाइलवरून बोलत होती, याची माहिती माध्यमांसमोर दिली. जरी ती दोन मुलांबरोबर बोलत असेल तरी तिला मारण्याचा अधिकार कुणी दिला? ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? असे सवाल अंधारे यांनी चाकणकरांना विचारले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महिला आयोग अध्यक्षांच्या नियुक्ती प्रकरणात लक्ष घालून जबाबदार व्यक्तीला पदावर नेमावे. पुनर्वसनासाठी पदाचा वापर होऊ देऊ नका. पक्षाची आणि महिला आयोगाची इभ्रत राखा, असेही अंधारे तटकरेंना उद्देशून म्हणाल्या.
त्यात अंधारे म्हणाल्या की, वर्षा आणि हर्षा या जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख होता. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी महिला आयोगाकडे सुपुर्द केले होते. जर पत्रकार परिषद घ्यायची एवढीच हौस असेल तर मग चाकणकर यांनी या प्रकरणात पत्रकार परिषद का घेतली नाही? असा सवाल अंधारे यांनी केला.
प्रशांत बनकरला सुनावली ३० पर्यंत पोलिस कोठडी
डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याची पोलिस कोठडी संपल्यामुळे त्याला मंगळवारी फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने बनकरला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारी वकीलांनी आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. दोन दिवसांची कोठडी सुनावली.
डायरीत ८४ शवविच्छेदन; सरकार दप्तरी ३६ नोंदी
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी ती राहत असलेल्या घरातून एक खासगी नोंदवही (डायरी) समोर आली आहे. त्यात तिने आतापर्यंत केलेल्या तब्बल ८४ पेक्षा जास्त शवविच्छेदन अहवालांच्या नोंदी आहेत.
प्रत्यक्षात आरोग्य विभागात २ त्यांच्या नावावर केवळ ३६ नोंदी आहे. डायरीमुळे नोंदीतील तफावतीचे नवीन रहस्य समोर आले आहे.
'बदनें'चे कारनामे, व्हिडीओ आले समोर
फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचा एक दबंग पोलिस अधिकारी अशी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने अनेक कारनामे केल्याचे समोर येत आहे. त्याने पोलिस स्टेशनला साखर कारखान्यांचे वसुली केंद्र बनविले, तो नागरिकांशी रस्त्यावर हुज्जत घालतो, तसेच तो पोलिसांचे सिंडिकेट चालवत असल्याच्या आरोपांचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.