Join us  

'पळा, पळा आग'; अचानक वीजपुरवठा खंडित, प्रचंड किंचाळ्या, रहिवाशांनी सांगितला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 8:45 AM

ताडदेव येथील भाटिया रुग्णालयासमोरील कमला या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली.

मुंबई: ताडदेव येथील भाटिया रुग्णालयासमोरील कमला या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सहा रहिवासी मृत्युमुखी पडले, तर २४ जण जखमी आहेत. महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्याअंतर्गत इमारतीचे मालक व पदाधिकाऱ्यांना अग्निरोधक यंत्र कार्यान्वित ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या इमारतीमध्ये बसवण्यात आलेली अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरली. यामुळे आगीचा धोका वाढला.

सकाळी ब्रश करत असतानाच इमारतीमध्ये 'पळा, पळा आग लागली'चे आवाज येऊ लागले. त्यामुळे नेमके झाले तरी काय याचा अंदाज इमारतीतील रहिवाशांना आला नाही. इमारतीमधील रहिवाशी शुभम पाटील यांच्या म्हणण्यानूसार सकाळी ब्रश करत असताना अचानक इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर इमारतीमधून मोठ्या प्रमाणात किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. कोणीतरी दार जोरात ठोठावले आणि पळापळा आग लागली, असा आवाज येऊ लागला. 

आम्ही सर्व त्या वेळेस इमारतीच्या बाहेर पडण्यासाठी पळत सुटलो. मात्र इमारतीमध्ये धूर इतका पसरला होता की, आग कुठे लागली हे कळायलाच मार्ग नव्हता. तरीदेखील आम्ही कसेबसे पायऱ्यांवरुन तळमजला गाठला. काहीजण खाली येण्यासाठी लिफ्टची वाट पाहत होते. मात्र त्यांना वेळीच सर्तक करत आम्ही पायऱ्यांवरुन खाली उतरण्याचा सल्ला दिला. आम्ही इमारतीच्या तरुणांनी जसे जमेल तसे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं यांना इमारती बाहेर पडण्यास मदत केली. 

प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. मात्र, यामागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी उपायुक्त (परिमंडळ दोन) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी डी. के. घोष, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) आणि उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव, शहर) यांचा समावेश असेल.

मंत्री आदित्य ठाकरे गेले घटनास्थळी-

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांशी बोलून या दुःखद प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. त्यांनी हाॅस्पिटलमध्ये जाऊन रूग्णांवरील उपचारांची माहिती घेतली.

टॅग्स :आगमृत्यूमुंबईमुंबई महानगरपालिका