मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 01:01 AM2018-10-17T01:01:19+5:302018-10-17T01:01:41+5:30

एटीएस, आयबी, गुन्हे शाखा लागली कामाला : कोरेगावच्या व्यावसायिकाकडून पोलिसांची दिशाभूल

Rumors of terrorist attacks in Mumbai again | मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा

मुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : तीन संशयित व्यक्ती मुंबईत २६/११ सदृश्य दहशतवादी कृत्य करण्याची तयारी करत असून, मुंबईत पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचत आहेत. यात एक मॉलदेखील त्यांच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती शनिवारी रात्री विनायक हरिदास बर्गे (३३) नावाच्या व्यक्तीने पोलीस आयुक्त कार्यालयाला दिली. नवरात्रौत्सव असल्याने असा काही अनुचित प्रकार शहरात घडू नये, म्हणून पोलिसांसह, गुप्तचर यंत्रणा, विशेष शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकानेही तपास सुरू केला. मात्र, सतत चोवीस तास तपास केल्यानंतर अखेर तो बनाव असल्याचे पोलिसांना समजले आणि त्यांनी दिशाभूल करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या.


बर्गे हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहूतील रुईया पार्कमागे बर्गे याने तीन संशयित व्यक्तिंना पाहिले. त्यात एकाने पठाणी ड्रेस घातला होता. टॅबवर तो अन्य दोन साथीदारांसोबत करत असलेली चर्चा त्याने ऐकली. ‘२६/११ का अधुरा काम पुरा करना है, इस बार खाकी अंदर से मदत करेगी, डरने की जरूरत नही, पाच बॉम्बब्लास्ट करना है और ओबेरॉय मॉल को भी उडाना है,’ असे तो अन्य दोघांना सांगत होता, असे बर्गे याने पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना सांगितले. ‘ए’ नामक व्यक्तीची हत्या करायची असून, त्याचे घरही उडवायचे आहे. सरकार पाडायचे आहे, या बदल्यात आपल्याला करोडो रुपये मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात आपल्याला खाकी वर्दी (पोलीस)च मदत करणार असल्याचेही ती व्यक्ती बोलत असल्याचेही त्याने करंदीकर यांना याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, जुहूमध्ये अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आले. पोलिसांनी जुहू चौपाटी, हॉटेल, लॉजेस आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हे अन्वेषण शाखेचे कक्ष ९ आणि एटीएसनेही चौकशी सुरू केली. आय. बी. आणि विशेष शाखेकडेही याबाबत काही माहिती आहे का, याबाबत माहिती घेतली. मात्र, त्यांच्याकडे काहीच माहिती नव्हती. अखेर पोलिसांनी बर्गेचीच उलट चौकशी सुरू केली, तेव्हा तो खोटे बोलत असल्याचे उघडकीस आले.

प्रसिद्धीसाठी केला प्रताप
पोलिसांनी दक्ष राहावे आणि मला प्रसिद्धी माध्यमांकडून प्रसिद्धी मिळावी, यासाठी मी हा सगळा प्रकार केल्याचे बर्गेने तपास अधिकाऱयांना सांगितले. पोलिसांना चुकीची माहिती देत, त्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी बर्गेला अटक केली.

Web Title: Rumors of terrorist attacks in Mumbai again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.