लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारत पाकिस्तानयुद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हाय अलर्ट असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी आणि अतिरेक्यांच्या नेहमी टार्गेट लिस्टवर असणाऱ्या मुंबई शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच, युद्धादरम्यान पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही मुंबई पोलिसांनी केले आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी आणि समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे.
या हल्ल्याच्या निमित्ताने जैशसोबत लष्कर ए तोयबा, हरकत ए अल जिहादे इस्लामी(हुजी), इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या भारतातील स्लीपर सेलना भारताविरोधात कारवायांसाठी बळ दिले जाऊ शकते. हे धोके लक्षात घेत मुंबई पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षेत वाढ करत संशयितांची झाडाझडती सुरू केली आहे. सीसीटीव्हीद्वारेही नियंत्रण कक्षातून मुंबई पोलिस लक्ष ठेवून आहेत. शहरात ओळख दडवून वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांची शोधमोहीम पोलिसांनी तीव्र केली आहे.
मच्छिमारांना सूचना...मच्छिमारीसाठी बोटींवर जाणाऱ्यांचे आधारकार्ड तसेच महत्त्वाचे कागदपत्रे घेणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काहीही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.खबऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे.
दादर चौपाटी बंदची अफवाच सकाळपासून दादर चौपाटीवरील शुकशुकाट पाहून दादर चौपाटी बंद असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, दादर चौपाटी बंद असल्याबाबत चुकीचे मेसेज काही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. तरी दादर चौपाटी सुरू आहे. याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी, असे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.