Join us  

सत्ता देणारा नथुराम हा सर्वांनाच आवडायला लागला आहे- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 9:43 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाला या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सचिन अहिर यांना लहान वयातच पवारसाहेबांनी सर्वकाही दिलं. त्यांना आमदार, मंत्री बनवलं आणि मोठं केलं. त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मीसुद्धा बऱ्याचदा मध्यस्थी केली.पवारसाहेबांनी सामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम केलं आहे. सध्या राष्ट्रवादी सोडून जात असलेल्या नेत्यासंदर्भात ते म्हणाले, सत्ता देणारा नथुराम हा सर्वांनाचा आवडायला लागला आहे. गांधी आता सत्ता देऊ शकत नसल्यानं जनता नथुरामाच्या पायाशी लोळण घेत आहे. वय वर्षं 80 असतानाही पवारसाहेब दौरे करतायत. साहेबांनी आम्हाला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.   

तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींवर आव्हाड यांनी यावेळी एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली होती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे? असा सवाल आव्हाडांनी केला होता.पाकिस्तानला शुभेच्छा देण्यात गैर काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचा थांबवलं, तर आपल्यालाही पाकिस्तानशी वैर ठेवण्यात काहीही रस नाही. उलट मैत्रीच हवी आहे. मात्र पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला हे आपल्याला भारत सरकारकडून कळलेलं नाही. तर पाकिस्तान कडून कळलं आहे. चाणाक्ष इम्रान खानने ट्विट करुन मोदी यांनी आपल्याला हा संदेश पाठवल्याचं जाहीर केलं. मग नरेंद्र मोदी यांनी हे जाहीर का केलं नाही ? या गोष्टीचा विचार केला तर मोदी यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरुन लव्हलेटर पाठवत बसायचं हाच तो दुटप्पीपणा आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता.  

टॅग्स :जितेंद्र आव्हाडसचिन अहिरशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस