रा. स्व. संघाच्या गृहसंपर्क अभियानाला निवडणुकीचा फटका; विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला फायदा
By यदू जोशी | Updated: October 31, 2025 11:12 IST2025-10-31T11:12:00+5:302025-10-31T11:12:00+5:30
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अभियानाचा निर्णय

रा. स्व. संघाच्या गृहसंपर्क अभियानाला निवडणुकीचा फटका; विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला फायदा
यदु जोशी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात सुरू करण्यात येणारे गृहसंपर्क अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आले आहे.
संघ स्वयंसेवक आणि संघ परिवारातील व्यक्तींनी घरोघरी जाऊन संघकार्याची माहिती द्यावी, संघाबद्दलचे गैरसमज दूर करावेत व राष्ट्रनिर्माणासाठी संघाच्या योगदानाबद्दल अवगत करावे, असे उद्दिष्ट ठेवून या उपक्रमाची रचना करण्यात आली होती. कोकण प्रांतात २३ नोव्हेंबरपासून १५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक घरी जाण्याचे लक्ष्यही निश्चित करण्यात आले होते. आता निवडणुकांमुळे हे अभियान तूर्त राबविले जाणार नाही.
विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत रा. स्व. संघाने भाजप-महायुतीच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. 'भाजपला मतदान करा,' असे कुठेही न म्हणता, मतदानाचा हक्क निश्चितपणे बजावा आणि देशहित समोर ठेवून मतदान करा, असे आवाहन त्यावेळी करण्यात आले होते.
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळातच संघाचे गृहसंपर्क अभियान सुरू होणार असल्याने त्या आडून भाजप-महायुतीचा अप्रत्यक्ष प्रचार केला जाईल, असे म्हटले जात होते. या निमित्ताने शताब्दी वर्षात संघावर भाजपचा प्रचार केल्याची टीकाही विरोधकांकडून झाली असती. मात्र, ही संधी विरोधकांना न देण्याची काळजी संघाने घेतली असल्याचेही म्हटले जात आहे.
दुसरा तर्क असाही दिला जात आहे की, अनेक स्वयंसेवक भाजपमध्येही सक्रिय असतात. निवडणूक प्रचारात ते व्यग्र असतील आणि अशावेळी प्रचार आणि गृहसंपर्क अभियान अशा दोन्हींचा ताण त्यांच्यावर येईल. त्यातून दोन्हींना पुरेसा वेळ देणे त्यांना शक्य होणार नाही. गृहसंपर्क अभियान पुढे ढकलण्याचे तेही एक कारण सांगितले जात आहे. आधी नगरपालिका, नंतर जिल्हा परिषद व शेवटी महापालिका निवडणूक होईल, असे मानले जात आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अभियानाचा निर्णय
जेथे निवडणूक आहे तिथे निवडणुकीनंतर लगेच हे अभियान राबवायचे की तिन्ही निवडणुका झाल्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये हे अभियान राबवायचे याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर हा निर्णय होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचारकाळ, धामधूम यात संघाच्या गृहसंपर्क अभियानातून अपेक्षित ते उद्दिष्ट साध्य होणार नाही. अभियान पुढे ढकलण्याचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. निवडणूक कार्यक्रम बघून अभियानाच्या तारखा ठरतील- लक्ष्मीकांत नक्काशे, कोकण प्रांत प्रचारक