मुंबई, ठाण्यातील शाळांना आरटीई पूर्ततेसाठी आठ कोटी रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:50 AM2019-11-20T03:50:45+5:302019-11-20T03:50:59+5:30

आरटीईअंतर्गत प्रवेश देणाऱ्या खासगी शाळांनाही मोठा दिलासा

Rs 8 crore sanctioned for RTE fulfillment in schools in Mumbai, Thane | मुंबई, ठाण्यातील शाळांना आरटीई पूर्ततेसाठी आठ कोटी रुपये मंजूर

मुंबई, ठाण्यातील शाळांना आरटीई पूर्ततेसाठी आठ कोटी रुपये मंजूर

googlenewsNext

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के प्रवेशाच्या शुल्काची मुंबई व ठाणे जिल्ह्यातील शाळांसाठी २०१८-१९ या वर्षासाठी सुमारे ५० टक्केप्रमाणे ९ कोटी १६ लाख रुपयांची प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना मिळणार आहे. यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश देणाऱ्या खासगी शाळांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक असून या प्रवेश शुल्काची पूर्तता राज्य शासन करते. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना शासनाने तातडीने मिळावी यासाठी भाजप शिक्षक सेलमार्फत शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली होती. त्या वेळी शेलार
यांनी तातडीने निधी देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या.

आता शासनाने निधी मंजूर केला असून त्या-त्या जिल्हा शिक्षणाधिकाºयांकडे वर्ग केला आहे. ही रक्कम ५० टक्के असली तरी उर्वरित ५० टक्के रक्कम तातडीने देण्यात यावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे.
ही रक्कम मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुमारे सहाशे शाळांना मिळणार असल्याची माहिती भाजप शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी दिली. यामुळे शाळांना दिलासा मिळाला आहे.

असे आहेत निकष
ज्या शाळांनी प्रवेश शुल्क शाळेच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे त्यांनाच ही प्रतिपूर्तीची रक्कम अदा केली जाणार आहे. सवलतीच्या दरात शाळेचा शासकीय जमिनीचा लाभ मिळालेला नसावा तसेच सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल पोर्टलवर नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे. ही सर्व माहिती शिक्षण अधिकाºयांकडून पडताळणी केल्यानंतरच शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम दिली जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष - २०१८-१९ साठी देण्यात येणारी जिल्हा प्रतिपूर्ती रक्कम
उत्तर मुंबई - ५१,४९,५६०
दक्षिण मुंबई - १३,८८,४४०
पश्चिम मुंबई - ५४,५१,१९५
मुंबई मनपा - ७,९६,३५,५००
एकूण - ९,१६,२४,६९५

Web Title: Rs 8 crore sanctioned for RTE fulfillment in schools in Mumbai, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.