पुलांच्या सुशोभीकरणावरील ७६० कोटींचा खर्च पाण्यात, ‘सुंदर मुंबई’ प्रकल्पाचा गाशा महापालिकेने गुंडाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:57 IST2025-12-03T09:53:06+5:302025-12-03T09:57:43+5:30
१७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची सद्य:स्थिती आणि भवितव्य यावर पालिकेतील कोणताही वरिष्ठ अधिकारी भाष्य करण्यास तयार नाही.

पुलांच्या सुशोभीकरणावरील ७६० कोटींचा खर्च पाण्यात, ‘सुंदर मुंबई’ प्रकल्पाचा गाशा महापालिकेने गुंडाळला
-जयंत होवाळ, मुंबई
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सुंदर मुंबई’चा सुरू केलेला प्रकल्प मुंबई महापालिकेने अखेर गुंडाळला आहे. कामाचा दर्जा न टिकवता आल्यामुळे यावर खर्च केलेले ७६० कोटी रुपयेदेखील पाण्यात गेले आहेत. या सुशोभीकरणावर रस्त्यांचे ‘चांदणी बार’ केल्याची टीका ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.
विशेष म्हणजे, १७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची सद्य:स्थिती आणि भवितव्य यावर पालिकेतील कोणताही वरिष्ठ अधिकारी भाष्य करण्यास तयार नाही. या प्रकल्पावर चौफेर टीका होत असल्याचे कारण वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. महत्त्वाचे म्हणजे सुशोभीकरण केलेल्या काही ठिकाणी दुरवस्था झाल्याचेदेखील आढळून येत आहे.
काय स्पष्ट नाही?
सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक कामे हाती घेण्यात आली होती. या कामांपैकी केलेली किती कामे टिकली, याबद्दल सार्वजनिक तपशील द्यायला पालिकास्तरावर कोणीही तयार नाही. प्रत्यक्षात किती खर्च केला, हेही सांगण्यास कोणी तयार नाही.
पदपथांवरील दिव्यांचा
आधार घेत रांगोळी काढल्यासारखे दिवे बसवण्यात आले होते, तिरंगी रंगात उड्डाणपुलांवर रोषणाई करण्यात आली होती. अनेक ठिकाणी दिवे आणि रोषणाईची बत्ती गूल झाली आहे.
उड्डाणपुलाच्या खाली सुशोभीकरण करण्यात आले होते, नामफलक लावण्यात आले होते, रस्ता दुभाजकांच्या ठिकाणी रोपटी लावण्यात आली होती. यापैकी अनेक ठिकाणी दुरवस्था झाल्याचे आढळून आले आहे.
ही कामे होणार होती
उड्डाणपुलांवर रोषणाई, पदपथांची दुरुस्ती रस्ते दुभाजकांच्या मध्ये हिरवळ तयार करणे, पुलांच्या खालच्या भागात रंगरंगोटी करणे, रस्त्यांचे दुरुस्ती व पुनर्बाह्यीकरण, रस्ता दुभाजक, फूटपाथ, पादचारी मार्ग, ट्रॅफिक आयलँड्स, भिंतीवर ग्राफिकी, झेब्रा क्रॉसिंग, पूल/ब्रीज/भिंतीवर पेंटिंग, स्ट्रीट फर्निचर व सार्वजनिक सुविधांची सुधारणा, पार्क, गार्डन, समुद्रकिनारे, उद्याने, सार्वजनिक शौचालय सार्वजनिक जागा, समु्द्रकिनारे, सार्वजनिक इमारती-शाळा या ठिकाणी मूलभूत सुविधा-सुधारणेसह सौंदर्यीकरण दुसऱ्या टप्प्यात ३२० नवीन प्रकल्प जाहीर करण्यात आले, ज्यांचा अंदाजित खर्च ११० कोटी इतका होता.
वेगवेगळ्या टप्प्यांत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी हा निधी होता. एकूण २७ वॉर्डांत सुमारे ४५० कोटींचे वाटप झाले, त्यातून कोणती कामे झाली याचा एकत्रित तपशील पालिकेकडे नाही, तो वॉर्ड स्तरावर मिळेल, असे सांगण्यात आले.