पैसा नसता तर जीव वाचला नसता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:43 IST2025-05-27T12:43:48+5:302025-05-27T12:43:48+5:30

मुख्यमंत्री सहायता निधीतून गेल्या चार महिन्यांत मुंबईतील ४३१ रुग्णांना चार कोटींची मदत

Rs 4 crore assistance provided to 431 patients in Mumbai from Chief Minister Relief Fund in the last four months | पैसा नसता तर जीव वाचला नसता

पैसा नसता तर जीव वाचला नसता

मुंबई : महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त बाधित नागरिकांनाही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली जाते. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यातील एकूण ४३१ रुग्णांना ४ कोटी ७ लाख ५५ हजारांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून करण्यात आली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे मुख्यालय मंत्रालयातील मुख्य इमारतीत आहे. कॉकलियर इम्प्लांट (वय २ ते ६), यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, बॉन मॅरो आणि हाताचे प्रत्यारोपण यासहहिप रिप्लेसमेंट, कर्करोग, अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसिस, नवजात शिशुंचे आजार, गुडघा प्रत्यारोपण, विद्युत अपघात रुग्ण आदी २० आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते.

पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज 
वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक
डॉक्टरांच्या सही व शिक्क्यासह प्रमाणपत्राची मूळप्रत 
तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. १.६० ७५ लाख पेक्षा कमी असणे आवश्यक)
महाराष्ट्राचे रेशनकार्ड, आधारकार्ड 
संबंधित आजाराचे रिपोर्ट
अपघात असल्यास एफआयआर असणे आवश्यक
अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र

‘या’ रुग्णांना मिळते मदत

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या तिन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या व राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांचे अर्ज वैद्यकीय समितीमार्फत तपासून त्यानंतरच अर्थसहाय्य दिले जाते. रुग्णालयात उपचार सुरू असताना अर्ज सादर करणे आवश्यक आहे. रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अर्थसहाय्य देण्यात येत नाही.

रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन आता जिल्हास्तरावर कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सातत्याने सुधारणा करत आहोत. लवकरच तांत्रिक पातळीवरही काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. यात रुग्ण व नातेवाईक यांच्या प्रश्नांची उत्तरे व शंकांचे निरसन करण्यास वॉर रूम तयार केली जाणार आहे - रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुंबई 
 

Web Title: Rs 4 crore assistance provided to 431 patients in Mumbai from Chief Minister Relief Fund in the last four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई