पाच वर्षांत ‘पेंग्विन्स’वर २५ कोटी रुपयांचा खर्च! हाउस किपिंगसाठी जवळपास २७ कोटी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:19 IST2025-07-03T09:18:41+5:302025-07-03T09:19:25+5:30
राणीच्या बागेत अनेक पारंपरिक वृक्षासोबत, विविध प्रकारची दुर्मीळ झाडे, वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी बहरलेली राणीची बाग अनेक संशोधक, विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी प्रेरित करते. त्यामुळे येथील वृक्षसंपदेच्या देखभालीवर बराच खर्च होत असतो.

पाच वर्षांत ‘पेंग्विन्स’वर २५ कोटी रुपयांचा खर्च! हाउस किपिंगसाठी जवळपास २७ कोटी खर्च
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विन हे तेथे येणाऱ्या पर्यटकांचे आणि प्रेक्षकांचे विशेष आकर्षण आहेत. या पेंग्विनवर मागील पाच वर्षांत २५ कोटी ८३ लाख रुपये खर्च झाला आहे. त्याचसोबत प्राणिसंग्रहालयातील उद्यानांच्या देखभालीसाठी ३१ कोटी, तर हाउस किपिंगसाठी जवळपास २७ कोटी खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून पुढे आली आहे.
राणी बाग प्रशासनाकडे मागील पाच वर्षांत केलेल्या खर्चाची माहिती आरटीआय कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी मागितली होती. पालिकेने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२५ या काळात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनची देखभाल, हाउस किपिंग आणि इतर देखभालीवर १०५ कोटी रुपये खर्च केला आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च उद्यान विभागावर, त्यानंतर पेंग्विनच्या देखभालीवर करण्यात आला आहे.
दरम्यान, राणीच्या बागेत अनेक पारंपरिक वृक्षासोबत, विविध प्रकारची दुर्मीळ झाडे, वनस्पती आहेत. विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी बहरलेली राणीची बाग अनेक संशोधक, विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी प्रेरित करते. त्यामुळे येथील वृक्षसंपदेच्या देखभालीवर बराच खर्च होत असतो.
पक्ष्यांची संख्या २१ वर
कोरोना व टाळेबंदीमुळे घसरलेले प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पुन्हा वाढले आहे. राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या आता २१ वर गेल्याने त्यांच्या देखभाल खर्चात वाढ झाली आहे.
शिवाय पेंग्विन कक्षाची देखभाल, वातानुकूलन व्यवस्था, जीवरक्षक प्रणाली, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी बराच खर्च होत असतो.
१ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२५ दरम्यान खर्च
हाउस किपिंग रु.२७,११,०९,००१
सीएसएमसी देखभाल रु. २१,४३,८५,०५२
उद्यान देखभाल रु. ३१,२०,६५,८७३
पेंग्विन देखभाल रु.२५,८३,४५,७३३