Join us

‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 05:39 IST

फिरत्या पम्पिंग स्टेशनचा वापर पालिका पहिल्यांदाच करत आहे. पाण्याचा वेगाने निचरा करण्यात ते किती उपयुक्त ठरतील हे यंदाच्या पावसात कळेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यात सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिका पाणी उपसा करणारे पंप बसवणार आहे. तसेच फिरत्या पम्पिंग स्टेशनचीही व्यवस्था करणार आहे. हे पंप ट्रकवर बसवलेले असतील. ज्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी अतिरिक्त साहित्य लागेल त्या भागात हे ट्रक नेले जातील. 

विशेष करून बांधकाम क्षेत्र, पूरप्रवण क्षेत्र तसेच सखल भागातील पाण्याचा उपसा करण्यासाठी हे फिरते पम्पिंग स्टेशन उपयोगी पडणार आहे. चिंचोळे रस्ते, गल्ल्या या ठिकाणी हे पंप सहजरीत्या नेता येऊ शकतात. हे फिरते पम्पिंग स्टेशन चार वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतले आहेत. त्यासाठी पालिका आठ कोटी खर्च करणार आहे. 

सखल भागात जास्त संख्या 

फिरत्या पम्पिंग स्टेशनचा वापर पालिका पहिल्यांदाच करत आहे. पाण्याचा वेगाने निचरा करण्यात ते किती उपयुक्त ठरतील हे यंदाच्या पावसात कळेल. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. काही भाग असे आहेत की, ते ‘पाणी साचण्याच्या जागा’,या वर्गवारीत येत नाहीत. तेथे पंप बसवण्यात आलेले नाहीत. मात्र, त्याही ठिकाणी पाणी साचत असल्याचे आढळून आले आहे. अशा भागात फिरते पम्पिंग स्टेशन उपयोगी ठरू शकते. पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने २०० पेक्षा जास्त पंप विविध भागांत बसवले आहेत. सखल भागात त्यांची संख्या जास्त आहे.

 

टॅग्स :पाऊसमुंबई महानगरपालिका