कळंबोलीतील हॉकर्स झोन बनले रोल मॉडेल
By Admin | Updated: July 14, 2014 23:17 IST2014-07-14T23:17:05+5:302014-07-14T23:17:05+5:30
ऊन, पावसात बसून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजीपाल्याची विक्री करणारे फेरीवाले सुरक्षित झाले असून आपल्या ग्राहकांनाही चांगली सेवा पुरवित आहेत

कळंबोलीतील हॉकर्स झोन बनले रोल मॉडेल
कळंबोली : ऊन, पावसात बसून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजीपाल्याची विक्री करणारे फेरीवाले सुरक्षित झाले असून आपल्या ग्राहकांनाही चांगली सेवा पुरवित आहेत. कळंबोलीत आता दोन हॉकर्स झोन सुसज्ज पाणी, लाईटची सुविधा व शेड यांनी आधुनिक बनले असून आता हे हॉकर्स झोन इतर सिडको वसाहतीसाठी ‘रोल मॉडेल’ ठरणार आहेत. यासाठी फेरीवाला संघटनेचा हातभार लागल्यानेच ही किमया घडली आहे.
कळंबोली सेक्टर-२ आणि सेक्टर-५ या ठिकाणी सिडकोच्या नियोजित हॉकर्स झोनमध्ये हे टपरीधारक विक्रीसाठी बसत होते. हॉकर्स झोनच्या जागेत बसल्याने साहजिकच रस्त्यांवरील फेरीवाल्यांची संख्या कमी झाली आहे. या फेरीवाल्यांना येथे जागेव्यतिरिक्त कोणतीच सुविधा नव्हती. समाजसेवक आत्माराम पाटील यांनी सिडको प्रशासनाशी पाठपुरावा करुन दोन हॉकर्स झोनसाठी कंपाऊंड व बसण्याचे ओटे यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करुन घेतला. ऊन, पावसातून फेरीवाल्यांना व ग्राहकांना खरेदीसाठी सोयीचे व्हावे यासाठी शेड गरजेचे होते. सर्व फेरीवाल्यांनी वर्गणी काढून व आपलाच प्रतिनिधी नेमून सुसज्ज अशा शेड बांधल्या आहेत. त्यामुळे सिडको वसाहतीमधील कळंबोली येथील बारकुबाई नामदेव पाटील भाजीमंडई ‘रोड मॉडेल’ ठरली आहे. नुकतीच सिडकोचे अतिरिक्त मुख्य नियोजनकार किरण शिंदे यांनी या हॉकर्स झोनची पाहणी करुन या हॉकर्स मॉडेलचे निर्माते आत्माराम पाटील यांची प्रशंसा केली व असे हॉकर्स मॉडेल संपूर्ण नवी मुंबईत (सिडको वसाहतीमध्ये) राबविणार असल्याचे सांगितले.
कळंबोलीतील फेरीवाल्यांना कायमस्वरुपी चांगल्या सुविधायुक्त जागा मिळावी हे आत्माराम पाटील यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी सर्व फेरीवाल्यांना एकत्र करण्यासाठी ही संकल्पना सेक्टर-२ आणि सेक्टर-५ येथे राबविली आहे. या दोन हॉकर्समध्ये सुमारे २२५ फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. कळंबोलीत एकूण ७ हॉकर्स झोन आहेत. बाकी उर्वरित ५ ठिकाणीही अशा प्रकारच्या सुविधा सिडकोच्या सहकार्याने करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)