Join us  

पुण्यातील भिडे वाड्याचं स्मारक करा, रोहित पवारांनी घेतला पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 4:47 PM

भिडे वाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि तिथे पुन्हा शाळा सुरु करावी

मुंबई - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा येथे देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू सामाजिक, ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे; पण त्याचे अद्यापही योग्य प्रकारे जतन होत नसून, भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे,' अशी मागणी सातत्याने होत आहे. या कामी आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी सांस्कृतिक कामकाजमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली आहे.  

भिडे वाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि तिथे पुन्हा शाळा सुरु करावी, या मागणीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. हा विषय शासनाच्या अजेंड्यावर घेऊन याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन अमित देशमुख यांनी दिल्याचं, रोहित पवार यांनी सांगितलंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या वास्तूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळेल आणि भिडे वाड्याचा विकास वेगाने होईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यामुळेच मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले होऊन त्या आज वेगवेगळ्या क्षेत्रांत भरारी घेत आहेत. एका अर्थाने भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणाचा पाया रचला गेला. पण आज याच भिडे वाड्याची खूप दुरवस्था झाली आहे. 'महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी 1848 मध्ये भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे; म्हणून अखंड महाराष्ट्रातच नव्हे, तर बाहेरच्या राज्यातही 'सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती'च्या वतीने मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण आंदोलन आणि उपोषण करून, सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, या मागणीसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहेत. मात्र, सरकारी पातळीवर या मागण्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. 

टॅग्स :रोहित पवारपुणेमहात्मा फुले वाडा