Join us  

आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील; रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 9:01 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कुटुंबातील गृहकलहामुळे आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कुटुंबातील गृहकलहामुळे आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही, कृपया करुन तसं काहीही अफवा पसरु नका. आमचं कुटुंब एकत्र असून पवारसाहेबांचा निर्णय कुटुंबात अंतिम मानला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांनी देखील आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील असं म्हणत पवार कुटुंबात कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

रोहित पवार म्हणाले की, माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा, सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असतं? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. तसेच पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होउदे पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की, आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

अजित पवार यांनी पवार कुटुंबीयातील गृहकलहासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्या कुटुंबात कसलाही कलह नाही, कृपया करुन तसं काहीही अफवा पसरु नका. आमचं कुटुंब एकत्र असून पवारसाहेबांचा निर्णय कुटुंबात अंतिम मानला जातो. शरद पवार हे कुटुंबाचे प्रमुख असल्याने त्यांचा शब्द पाळला जातो, असे अजित पवार यांनी म्हटले. सुरुवातीला राजकारणात सुप्रिया आल्यावरही असंच उकरलं. नुकतंच पार्थही राजकारणात आल्यावर पुन्हा तेच, आता रोहित आल्यावरही पुन्हा तेच, असे म्हणत आमच्याच कुठलाही गृहकलह नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. यावेळी, अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस