रस्ते आता प्लास्टिकचे! कांजूरमार्गमधील प्रकल्प सर्वांना भुरळ पाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:41 IST2025-01-25T11:41:21+5:302025-01-25T11:41:47+5:30

Mumbai News: कचऱ्यात टाकलेल्या, वाया गेलेल्या किंवा जप्त केलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करण्याचा पालिकेचा विचार आता मागे पडल्याचे चित्र आहे.

Roads are now made of plastic! The project in Kanjurmarg will fascinate everyone | रस्ते आता प्लास्टिकचे! कांजूरमार्गमधील प्रकल्प सर्वांना भुरळ पाडणार

रस्ते आता प्लास्टिकचे! कांजूरमार्गमधील प्रकल्प सर्वांना भुरळ पाडणार

मुंबई - कचऱ्यात टाकलेल्या, वाया गेलेल्या किंवा जप्त केलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करण्याचा पालिकेचा विचार आता मागे पडल्याचे चित्र आहे. मात्र, आयआयटी -मुंबईच्या सहकार्याने कचरा प्रक्रिया केंद्रात जमा होणारे प्लास्टिक वापरून कांजूरमार्ग येथे अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेडने (एडब्लूएचसीएल) प्रायोगिक तत्त्वावरील रस्ता तयार केला आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यांची जागा आता हे प्लास्टिक रस्ते घेतील, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

मुळात राज्यात जून २०१८पासून प्लास्टिक बंदी लागू झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात जप्त केलेले प्लास्टिक पालिकेच्या गोदामात पडून होते. काही शहरांमध्ये प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करण्याचे प्रयोग झाल्याने मुंबईतही त्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली. मात्र, काळाच्या ओघात तो विषय मागे पडला. आता कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचा विकास यांची सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातून कांजूरमार्ग येथे २७० मीटर लांब रस्त्याची आखणी करण्यात आली. त्यासाठी आयआयटी, मुंबईची मदत घेण्यात आली.

या रस्त्याच्या बांधकामासाठी डांबरसदृश्य बिटूमेनमध्ये ६ टक्के वितळवलेले आणि तुकडे केलेले प्लास्टिक वापरण्यात आले असून, ते कचऱ्यातून जमा करण्यात आले आहे. या पद्धतीमुळे पारंपरिक ‘बिटूमेन’वर अवलंबित्व कमी करणे शक्य आहे. 

प्लास्टिक कचऱ्याची  समस्या मिटणार
पुनर्वापर न करता येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या सोडविणेही शक्य आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व आयआयटी, मुंबईच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील पर्यावरणीय भू-तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. डी. एन. सिंह यांनी केले. 

बिटूमेन काय आहे?
बिटूमेन हा कच्च्या तेलाच्या उर्ध्वपतनातून तयार 
होणारा डांबरसदृश्य काळा पदार्थ आहे. 
त्याचा वापर रस्ते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. 
बायोबिटूमेन हा जैव-आधारित बंधक पदार्थ आहे.  

२७० मीटर लांब रस्ता
कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचा विकास यांची सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातून कांजूरमार्ग येथे या रस्त्याची आखणी करण्यात आली. 
त्यासाठी आयआयटी, मुंबईचे मार्गदर्शन घेण्यात आले. या तंत्रज्ञानामध्ये प्लास्टिकपासून डांबरसदृश्य बिटूमेन तयार करण्यात आले आहे.

Web Title: Roads are now made of plastic! The project in Kanjurmarg will fascinate everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई