Join us  

आरएनए ग्रुपच्या कर्मचाऱ्यांची चेंबूरमध्ये निदर्शने; दोन वर्षांचे थकीत वेतन देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 1:16 AM

४०० कामगारांचा समावेश

मुंबई : आरएनए बांधकाम समूहातील सुमारे ४०० कामगारांना मागील दोन वर्षांपासून वेतन मिळालेले नाही. यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारी आरएनए समूहाच्या चेंबूर येथील कार्यालयाजवळ निदर्शने केली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व हातात फलक घेऊन आपला निषेध व्यक्त केला. कामगारांच्या या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनादेखील सहभागी झाली होती.

आरएनए ग्रुपच्या एचआर विभागाचे माजी व्यवस्थापक नीलेश कदम यांनी सांगितले की, आम्हा कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी, २०१८ पासून वेतन मिळालेले नाही. या विरोधात कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारला असता, त्यांच्याकडून दरवेळी उडवाउडवीची उत्तरे व अपमानास्पद वागणूक मिळत गेली. आरएनएचे संचालक अनुभव अग्रवाल यांनी शारीरिक मारहाण करून धमकी दिली, म्हणून मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कर्मचारी अनुजनाथ गलगोटीया म्हणाले, गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मालकाने दमदाटी करून नोकरी सोडण्यास भाग पाडले. तरीदेखील सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनी प्रशासनावर विश्वास ठेवून बिनपगारी काम केले, परंतु कंपनी प्रशासनाने आमची फसवणूक केली आहे. आमचे हक्काचे पैसे मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे.

आंदोलन अधिक तीव्र करणार!

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक म्हणाले, ‘फेब्रुवारी, २०१८ पासून कर्मचाºयांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना घरखर्च चालविणे कठीण झाले आहे. यापुढे कंपनी व्यवस्थापनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास, आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व कंपनी मालकांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारमुंबईचेंबूर