लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे १११ रुग्ण सापडले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, मुंबईत या आजाराचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने सद्य:स्थितीचा आढावा घेतला असून शहरातील महापालिका रुग्णालयांमध्ये १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
जीबीएससाठी देण्यात येणारी सर्व औषधे शहरात उपलब्ध आहेत. मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा ऑटोइम्यून आजार असून, यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या चेतानासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णांमध्ये पक्षाघातही होऊ शकतो. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असते.
उपचारांसाठी विशेष व्यवस्था करा - मुख्यमंत्री फडणवीसजीबीएस रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीबीएसबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी. हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे, अशा सूचना फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केल्या.
लक्षणे काय?हात-पायांमध्ये अचानक अशक्तपणा जाणवणे.चालण्यात त्रास जाणवणे.अतिसारकाय काळजी घ्यावी?पाणी उकळून प्यावेताजे अन्न घ्यावे.वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावाहात आणि पाय दुखणे आणि अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांना दाखवावे.
नागरिकांनी घाबरून न जाता कुठलेही या आजाराचे लक्षण आढळल्यास मार्गदर्शन आणि उपचाराकरिता जवळच्या मनपा रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा.- भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका