बिबट्याच्या निधनाच्या निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 00:58 IST2019-09-25T00:57:44+5:302019-09-25T00:58:05+5:30
अंत्यविधी उरकल्याने संशय बळावला

बिबट्याच्या निधनाच्या निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नऊ वर्षांचा ‘भीम’ नर बिबट्याचा सोमवारी सकाळच्या सुमारास हृदयक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे मुलगा जीत आठवले याच्या नावे ‘भीम’ बिबट्याला दत्तक घेत होते. भीम बिबट्याचा मृत्यू हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला, असा आरोप रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी आरपीआय कार्यकर्त्यांनी वनअधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शने केली.
भीम पँथरचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कळविण्यात आले नसून बिबट्याचा अंत्यविधी वन अधिकाºयांनी उरकून टाकला. संतप्त रिपाइं कार्यकर्त्यांनी भीम पँथरच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, तसेच फॉरेन्सिक चाचणीद्वारे भीम बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यात यावे, संबंधित वन अधिकाºयांना निलंबित करावे, सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे वनविभागाच्या अधिकाºयांविरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली. भीम बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी रिपाइं कार्यकर्त्यांना दिले.