मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीवरून झालेला वाद, त्यानंतर नागपूरमध्ये झालेली दंगल यामुळे सध्या राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण असतानाच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. रमजान ईददरम्यान ३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यान मुंबईतील डोंगरी परिसरात हिंदू-मुस्लिम दंगल आणि बॉम्बस्फोट होऊ शकतात, मुंबई पोलिसांनी सतर्क राहावं, असा इशारा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार नवी मुंबई पोलिसांना टॅग करून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सावध आणि सतर्क राहावं. ३१ मार्च आणि १ एप्रिलदरम्यान, डोंगरी परिसरात बेकायदेशीररीत्या राहणारे रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर हिंदू-मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात, असा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे. द शास्वत शुक्ला ट्रूथ स्पीक्स या एक्स हँडलवरून ही पोस्ट करण्यात आलेली आहे.
दरम्यान, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सायबर सेलकडून ही पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. डोंगरी परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, अद्यापतरी कुठलीही संशयास्पद हालचाल दिसून आलेली नाही.