मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 07:07 IST2026-01-15T07:07:19+5:302026-01-15T07:07:27+5:30
नवीन मशीनमधून मतदानात गडबड होणार नाही, याची गॅरंटी कोण घेणार? - राज ठाकरे

मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्रात मतमोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास 'पाहू' (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र, पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
बेलची मतदान यंत्रे केवळ मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती 'एम३ए' या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू), बॅलेट युनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादात्मकरीत्या पाडूचा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १४० पाडूंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाहूची गरज भासल्यास बेल कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते.
'पाडू' नावाचे नवे मशीन का जोडताय?
कोणत्याही राजकीय पक्षाला विचारात न घेता राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकीसाठी 'पाडू' नावाचे मशीन आणले आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून नवीन युनिट दाखवण्याची मागणी केली. मात्र, त्यावर उत्तर नाही. रोज कायदे बदलून सरकारला हव्या असलेल्या सुविधा, गोष्ट मिळवून देण्यासाठी आयोग काम करत आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी शिवतीर्थ येथे पत्रपरिषदेत केला. यावेळी उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेला १४० पाडू पाडू (प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) मशीन प्राप्त झाल्या आहेत. ईव्हीएम बंद पडले तर त्याचा वापर केला जाणार आहे; पण याबाबत कोणतीही माहिती आयोगाने दिली नाही. हे मशीन राजकारण्यांना दाखवावे, असे आयोगाला वाटले नाही. ही लोकशाही नसून बेबंदशाही आहे. नवीन मशीनमधून मतदानात गडबड होणार नाही, याची गॅरंटी कोण घेणार? असा प्रश्न राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विचारला.