जागतिक स्पर्धेत रिद्धी-सिद्धीला सुवर्ण
By Admin | Updated: December 31, 2014 22:37 IST2014-12-31T22:37:47+5:302014-12-31T22:37:47+5:30
शहरातील रिध्दी व सिध्दी या जुळया बहिणींने जागतिक शास्त्रीय संगीत व तबलावादन स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली आहे.

जागतिक स्पर्धेत रिद्धी-सिद्धीला सुवर्ण
उल्हासनगर: शहरातील रिध्दी व सिध्दी या जुळया बहिणींने जागतिक शास्त्रीय संगीत व तबलावादन स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली आहे. १ जानेवारीला दोन्ही बहिणी मायदेशी परतणार असुन शिवसेनेने भव्य सत्कार व जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्ीय संगीत अकादमीने, सिंगापुर येथे घेतलेल्या शास्त्रीय संगीत व तबलावादन स्पर्धेत शहरातील रिद्धी -सिध्दी या जुळया बहिणींनी इतिहास रचत सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली आहे. शहरातील मराठा सेक्शन परिसरात फिश टँकचे दुकान चालविणारे निलेश बोरकर यांच्या रिद्धी-सिद्धी जुळया मुली असून घरची परिस्थिती बेताची असतांना दोन्ही मुलींना शास्त्रीय संगीत शिकवीत आहेत. चेन्नई येथे चार महिन्यापूर्वी घेतलेल्या पात्रता फेरीत दोन्ही बहिणी पात्र ठरल्यानंतर, सिंगापूर येथे जागतिक संगीत स्पर्धा होती. सिंगापूर येथील संगीत स्पर्धेत भाग घेण्यासाठीची आर्थिक परिस्थिती बोरकर कुटुंबाची नसल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना मिळाली होती. राजेंद्र चौधरी यांनी शहर शिवसेनेच्या वतीने त्वरीत ५० हजाराची मदत केली. तसेच पालिकेकडे आर्थिक सहाय्यासाठी पाठपुरावा केल्यावर, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी २ लाखाची मदत केली आहे. सिंगापूर येथे पार पडलेल्या जागतिक शास्त्रीय संगीत स्पर्धेत रिध्द्ी हिने सुवर्ण तर तबलावादन स्पर्धेत सिद्धीने रौप्य पदक पटकावल्याची माहिती वडील निलेश बोरकर यांनी दिली आहे. शहरातील जुळया बहिनीने परदेशात यशाची पताका फडकविल्याने परिसरात फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. त्याचा भव्य सत्कार व जल्लोष शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.