रिक्षा-टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महाग,१ फेब्रुवारीपासून नवे दर लागू;परिवहन प्राधिकरणाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:38 IST2025-01-25T10:38:09+5:302025-01-25T10:38:56+5:30
Rickshaw-taxi travel News: मुंबई महानगर प्रदेशातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचा सामान्यांचा प्रवास आता महाग होणार आहे. तीन रुपये भाडेवाढीच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या मागणीला शासनाने मंजुरी दिली असून १ फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ अंमलात येणार आहे.

रिक्षा-टॅक्सीचा प्रवास ३ रुपयांनी महाग,१ फेब्रुवारीपासून नवे दर लागू;परिवहन प्राधिकरणाची मान्यता
मुंबई - मुंबई महानगर प्रदेशातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचा सामान्यांचा प्रवास आता महाग होणार आहे. तीन रुपये भाडेवाढीच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या मागणीला शासनाने मंजुरी दिली असून १ फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ अंमलात येणार आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे २३ रुपयांवरून २६ रुपये तर टॅक्सीचे भाडे २८ वरून ३१ रुपये होणार आहे. टॅक्सी, ऑटोरिक्षासाठी शेवटची भाडेवाढ ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आली होती.
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत वरील भाडेवाढीला मंजुरी मिळाली. मीटर रिक्षा आणि टॅक्सीसोबतच कूल कॅबचेही दर २० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. कूल कॅबसाठी पूर्वीचे प्रतिकिमी भाडे २६.७१ रुपयांवर ३७.०२ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे कूल कॅबसाठी दीड किमीपर्यंतच्या प्रवासासाठी आता ४० रुपयांऐवजी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर प्रतिकिमीसाठी ३७ रुपये मोजावे लागतील.
मीटर रीकॅलिब्रेशनला एप्रिलपर्यंत मुदत
नवीन दर पत्रकानुसार भाडे आकारणी करण्यास मंजुरी दिली असली तरी रिक्षा टॅक्सीचालकांना त्यांच्या मीटरमध्ये नवीन दरपत्रकाप्रमाणे भाडेवाढीची सुधारणा करणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी त्यांना ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.