Join us

मुंबई महानगर क्षेत्रात १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सी भाड्यात ३ रुपये वाढ; राज्य सरकारचीही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 06:58 IST

परिवहनमंत्री अनिल परब; प्रस्तावाला मिळाली राज्य सरकारची मान्यता

मुंबई : कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १ मार्चपासून ही भाडेवाढ लागू होणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी या संदर्भातील पत्रकार परिषदेत सांगितले. सहा वर्षांनंतर रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. या भाडेवाढीला मान्यता देण्यात आल्याचे परिवहनमंत्र्यांनी सांगितले.  त्यानुसार रिक्षाचे पहिल्या टप्प्याचे भाडे १८ रुपयांवरून २१, तर टॅक्सीचे २२वरून २५ रुपये करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षाचे भाडे १४.२० रुपये, तर टॅक्सी भाडे १६.९३ रुपये करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षाचे भाडे  २.०१ रुपयाने, तर टॅक्सीचे भाडे २.०९ रुपयांनी वाढले आहे.येत्या १ मार्चपासून भाडेवाढ लागू होणार आहे. मात्र, मीटर कॅलिब्रेशनसाठी तीन महिन्यांचा अवधी लागतो. त्यामुळे ३१ मेपर्यंत दरपत्रकाच्या आधारावर भाडे आकारण्याची मुभा असेल. या कालावधीत सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांनी मीटर कॅलिब्रेट करून घ्यावे.

शेअर रिक्षाच्या भाड्यातही होणार बदल

रिक्षा-टॅक्सीचे नवीन भाडे जाहीर झाल्यानंतर शेअर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही त्या अनुषंगाने वाढ केली जाईल. वाहतूक विभागाकडून संबंधित दर निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी सांगितले.

सीएनजी रिक्षाचीही भाडेवाढ

मुंबई, ठाणे परिसरात अडीच ते पावणेतीन लाख रिक्षा आहेत. त्यापैकी अंदाजे ९७ टक्के रिक्षा सीएनजीवर चालतात. मात्र पेट्रोल, डिझेल दरवाढ झाल्यानंतर सीएनजी दरात वाढ झाली नसतानाही सीएनजी रिक्षांची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :टॅक्सीऑटो रिक्षामुंबईमहाराष्ट्र सरकार