मुंबई : रिक्षाभाडे घेण्याच्या वादातून एका रिक्षा चालकावर अन्य चालकाने कटरने हल्ला केल्याची घटना १३ ऑगस्टला रात्री पवईतील आयटी ओरम पार्क परिसरामध्ये घडली. राकेशकुमार त्रिपाठी (४७) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे.
त्रिपाठी यांचा आरोप आहे की, स्थानिक रिक्षा चालक युवराज होतगीकाय (३२) आणि अंकुश जाधव (३५) हे वारंवार इतर चालकांना त्रास देतात, भाडे घेण्यावरून वाद घालतात आणि दारूच्या नशेत गोंधळ घालतात.
त्रिपाठी हे पवईमधील एक भाडे घेत असताना युवराज याने त्यांना स्थानिक नसल्याने भाडे घेण्यास मज्जाव केला, तसेच धमकावत शिवीगाळ केली. त्यामुळे त्रिपाठी यांनी पोलिसांत युवराजविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
सायंकाळी त्यानंतर, आयआयटी परिसरात ते चहा घेत असताना, युवराज आणि अंकुश यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. वादावादीनंतर युवराज याने कटर काढून त्रिपाठी यांच्या हातावर वार केला. विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी पवई पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी युवराज आणि अंकुश यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.