Join us
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची छेड काढणाऱ्या रिक्षाचालकाला अटक, मुलुंड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 21:36 IST

याप्रकरणी मुलुंड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता.

मुंबई : रिक्षातील प्रवासी तरुणीशी अश्लील वर्तन करणा-या रिक्षाचालकाला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सदानंद कृष्णा गाडेकर (वय ३७, रा. मुलुंड) असे त्याचे नाव असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेज व तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरुन त्याला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.

मुलुंडमधील संभाजीनगरातील २० वर्षाची तरुणी गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भावाला भेटून रिक्षातून घरी जात होती,त्यावेळी रिक्षाचालक गाडेकरने आरक्षातून तिच्याकडे पहात अश्लील हावभाव केले, तसेच मी नेतो तिकडे तू आली पाहिजेस, असे म्हणत तिने पंचरत्न मंदिराकडे रिक्षा नेण्यास सांगितले असताना अन्य मार्गाकडे वळविली होती. मात्र तरुणीने प्रसंगावधान राखित रिक्षातून उडी मारुन स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यामध्ये तिच्या डोक्याला मारही बसला होता.

याप्रकरणी मुलुंड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन भागातील सर्व रिक्षास्टॉप धुंडाळले होते. अखेर शनिवारी रात्री त्याचा शोध घेण्यात यश आले. सदानंद गाडेकरची पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई