Join us  

आरे कारशेड आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 9:18 PM

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी रातोरात पोलिस बंदोबस्तात शेकडो झाडे तोडण्यात आली होती. या कारशेडला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच स्थगिती दिली. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी विनाशकाले विपरित बुद्धी असे म्हणत टीका केली होती. 

उद्धव ठाकरेंनी परंपरेनुसार पदभार स्विकारल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित मुंबईत जन्मलेला,वाढलेला महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी काही वेगळं करता येईल का, याबाबत मी विचारधीन आहे. त्यासोबत महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितलं.    

आरेची झाडे तोडल्यानंतर आणि आधी आंदोलकांनी निदर्शने केली होती. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळेंसह अभिनेते अभिनेत्रींनीही या आंदोलनामध्ये सहभाग घेत पाठिंबा दिला होता. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

या आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. त्यांच्यावर कुठलाही खटला चालविला जाणार नाही, असे सांगतानाच ठाकरे यांनी येत्या एक दोन दिवसांत मंत्रिमंडऴ विस्तार करणार असल्याचे सांगितले. तसेच मी आणि सहा मंत्री एकत्र बसून निर्णय घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आज विधानसभा अध्यक्षांची निवड होती. आता आम्ही मोकळे झालेलो आहोत. आता पुढील कामे ही जोमाने करू. राज्याची नेमकी परिस्थिती काय आहे त्याचे अवलोकन करत आहोत. मी मेट्रोच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. विकासाच्या कोणत्याही कामाला मी स्थगिती दिलेली नाही. शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सर्व केल्याशिवाय मी राहणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्याचीच आठवण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नागरिकांनी करुन दिली. यावेळी 'आरे बचाव' असे पोस्टर हातात घेऊन शिवसेना भवनाबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी केली होती. 

टॅग्स :आरेउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री