प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाची आढावा बैठक ७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 5, 2023 21:38 IST2023-10-05T21:37:31+5:302023-10-05T21:38:17+5:30
प्रदेश काँगेस सरचिटणीस राजेश शर्मा यांची माहिती

प्रदेश काँग्रेसच्या कोकण विभागाची आढावा बैठक ७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत
मनोहर कुंभेजकर, मुंबई-अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यकारिणीच्या हैदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतील निर्देशानुसार प्रदेश काँग्रेसच्या विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. कोकण विभागाची आढावा बैठक दि ७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील रबाळे येथे होणार आहे. या बैठकीचे समन्वयक प्रदेश काँगेस सरचिटणीस व मुंबई महानगर पालिकेचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी लोकमतला ही माहिती दिली.
या बैठकीला माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे उपस्थित राहणार आहेत. राज्यस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या शिबिरातील निर्णयांच्या अमंलबजवाणीबाबत चर्चा करणे, मंडल कमिटी, बुख प्रमुखांची सद्य परिस्थिती, ग्राम समित्या, ब्लॉक कार्यकारिणीची माहिती, जिल्ह्यातील संघटनात्मक रिक्त पदे, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीत नावे नोंदवणे वा वगळणे, जिल्हा व ब्लॉक काँग्रेसच्या ठराव पुस्तिकांच्या तपासणीबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
काँग्रेस संघटना राज्यात मजबूत करून आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष राज्यात नंबर एकचा करण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न केले जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून या विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती राजेश शर्मा यांनी दिली.