बेस्टला महसूल, पण प्रवाशांचे हाल; शपथविधी सोहळ्याला कार्यकर्त्यांसाठी बेस्ट उपक्रमाच्या ५८२ बसची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:10 IST2024-12-06T11:10:19+5:302024-12-06T11:10:43+5:30

यासाठी गुरुवारपर्यंत ७५ लाखांचे आगाऊ शुल्कही जमा करण्यात आल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली. एकीकडे कार्यकर्त्यांची बडदास्त केली जात असताना दुसरीकडे कामाच्या दिवशी शहर आणि उपनगरातील सामान्य बेस्ट प्रवासी मात्र तासनतास बसेसची वाट पाहत ताटकळल्याचे चित्र दिसून आले.

Revenue to BEST, but plight of passengers; Arrangement of 582 buses of BEST initiative for the workers to the swearing-in ceremony | बेस्टला महसूल, पण प्रवाशांचे हाल; शपथविधी सोहळ्याला कार्यकर्त्यांसाठी बेस्ट उपक्रमाच्या ५८२ बसची व्यवस्था

बेस्टला महसूल, पण प्रवाशांचे हाल; शपथविधी सोहळ्याला कार्यकर्त्यांसाठी बेस्ट उपक्रमाच्या ५८२ बसची व्यवस्था

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदानावर नेते, कार्यकर्त्यांच्या गर्दीत आणि पोलिस बंदोबस्तात पार पडला. मुंबईच्या विविध ठिकाणांहून शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी बेस्टच्या तब्बल ५८२ बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.

यासाठी गुरुवारपर्यंत ७५ लाखांचे आगाऊ शुल्कही जमा करण्यात आल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली. एकीकडे कार्यकर्त्यांची बडदास्त केली जात असताना दुसरीकडे कामाच्या दिवशी शहर आणि उपनगरातील सामान्य बेस्ट प्रवासी मात्र तासनतास बसेसची वाट पाहत ताटकळल्याचे चित्र दिसून आले.

nबेस्ट उपक्रमाकडे सध्या आवश्यक बसचा ताफा नसल्याने आधीच मुंबईतील बेस्ट प्रवाशांची दैना होत आहे. २०१९ सालापासून खासगी कंत्राटदारांच्या बसगाड्या बेस्टच्या नावाने चालवताना, बेस्ट उपक्रम आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचा करार झाला होता. त्या करारानुसार बेस्टकडे स्वमालकीच्या ३,३३७ गाड्यांचा ताफा ठेवणे निश्चित करण्यात आले होते.

nत्यानंतर बेस्ट उपक्रमाने २०१९ सालापासून स्वमालकीच्या बसगाड्या खरेदी करणे बंद केले. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीचा ताफा कमी होण्यास सुरुवात झाली.

nआताच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात १,०८५ बस असून, आवश्यक ताफ्याच्या ३३ टक्केच बसच शिल्लक आहेत. यामुळे प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. शिवाय गर्दीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे उपक्रमाने नुकताच २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करताना बसगाड्यांचा ताफा वाढविण्यावर देखील भर दिला. मात्र तोपर्यंत मुंबईकर प्रवाशांचे आवश्यक ताफ्याअभावी हाल सुरू आहेत.

nअशात बेस्ट उपक्रमाकडून सोहळ्यासाठी पुरवण्यात आलेल्या गाड्यांमुळे बेस्ट प्रवाशांना प्रचंड त्रास झाल्याचे समोर आले. बेस्ट संघटना व सामान्य प्रवाशांकडून यावर जोरदार टीका होत आहे.

७५ लाखांचे आगाऊ शुल्क जमा

गुरुवारी अर्ध्या दिवसासाठी कार्यकर्त्यांच्या वाहतुकीसाठी बेस्ट उपक्रमाच्या ५८२ गाड्या आरक्षित करण्यात आपल्या होत्या. यामध्ये एसी आणि नॉन एसी सिंगल डेकर बसेसचा समावेश असून, त्याचे ७५ लाखांचे आगाऊ शुल्क जमा करण्यात आले होते. शिवाय उरलेली रक्कमही देण्यात येणार होती.

यात एका सिंगल डेकर बसचे अर्ध्या दिवसाचे भाडे हे १० हजार रुपये असून, एसी सिंगल डेकरचे भाडे ११ हजार २५० आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला एका दिवसात चांगला महसूल मिळाल्याची चर्चाही यानिमित्ताने होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून रोज अपुऱ्या बसच्या ताफ्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशांची गैरसोय होताना आपण पाहिले आहे. त्यातच शपथविधी कार्यक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्या वापरल्याचे निदर्शनास आले. वास्तविक प्रवाशांकरिता पुरेशा बसची उपलब्धता नसताना बेस्टने त्यांच्या बसगाड्या राजकीय कार्यक्रमासाठी वापरणे निंदनीय आहे.

- रुपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्यासाठी

Web Title: Revenue to BEST, but plight of passengers; Arrangement of 582 buses of BEST initiative for the workers to the swearing-in ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई