Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेस्ट’च्या २७ आगारांतील विश्रामगृहे, उपाहारगृहांचा हाेणार कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:27 IST

कर्मचाऱ्यांना दिलासा; प्रस्तावाला मंजुरी... खर्चाचा तपशील देण्याच्या बेस्ट उपक्रमाला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई :  बेस्ट उपक्रमाने २७ आगारातील विश्रामगृहे आणि उपहारगृहांचा कायापालट करण्यासाठी १० कोटींचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर केला आहे. समितीकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असली तरी याबाबतचा खर्चाचा तपशील देण्याचे निर्देश उपक्रमाला देण्यात आले आहेत. यामध्ये विश्रांतीगृहातील सुविधा, आगारांची देखरेख तसेच उपहारगृहातील दुरुस्त्यांचा समावेश आहे.

बेस्ट उपक्रमाच्या विविध आगारांमधील कर्मचाऱ्यांच्या विश्रामगृहांची स्थिती अत्यंत दयनीय असून, या दुरवस्थेमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या बेस्ट बसच्या चालक आणि वाहकांचे प्रचंड हाल होत आहेत. बेस्टची शहरात २७ आगार आहेत. आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना कामादरम्यान आराम करता यावा याकरिता विश्रामगृह बांधण्यात आली आहेत. परंतु विश्रामगृहांची स्थिती पाहता ते कोंडवाडे असल्याचे जाणवते. दुरवस्थेतील विश्रामगृहे आणि कँटीन कर्मचाऱ्यांना वापरावी लागत असल्याचा गंभीर मुद्दा बेस्ट समितीच्या बैठकीतही मांडण्यात आला होता. 

‘विश्रामगृहे की स्मशानभूमी’
कोंदट वातावरण, तुटलेली बाकडी, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था अशा समस्यांवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ही विश्रामगृहे आहेत की स्मशानभूमी, अशी टीकाही उद्धवसेनेचे बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी केली होती. 
हरकतीच्या मुद्द्याद्वारे त्यांनी बेस्टच्या आगारातील विश्रामगृहे आणि उपहारगृहांची दुरवस्था मांडली होती. त्यावर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी नाराजी व्यक्त केली, तर महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी विश्रामगृहाच्या सुधारणेसाठी पुढील बैठकीत प्रस्ताव मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार : गणाचार्य
भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी यासाठीची तरतूद कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित केला. अजून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत तरी या कामाला सुरुवात होणार नसल्याचे नमूद केले. या प्रस्तावासाठीची तरतूद अर्थसंकल्पात नसून सुधारित अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणार असल्याने तूर्तास समिती सदस्यांना गप्प बसविण्यासाठी तोंडाला पाने पुसण्यात आली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

कामांचे अंदाजपत्रक बेस्ट समितीकडे
बेस्ट उपक्रमाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडून या कामांचे अंदाजपत्रक तयार करून ते सोमवारी बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : BEST to revamp 27 depots' rest rooms and eateries.

Web Summary : BEST allocates ₹10 crore to renovate rest rooms and canteens across 27 depots. The initiative aims to improve facilities for bus drivers and conductors, addressing concerns raised about the poor conditions of existing amenities. A detailed expense report is awaited.
टॅग्स :बेस्ट