Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, गोव्यासह चार राज्यांतील प्रवाशांवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 06:50 IST

मार्गदर्शक सूचना जारी; कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही

मुंबई : कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने सोमवारी काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (RTPCR टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, तर पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. रिपोर्ट नसेलेल्यांची टेस्ट केली जाईल. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गावरील प्रवाशांना हे निर्बंध लागू असतील.  

चार राज्यातून ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनाही कोरोना रिपोर्ट सादर करावा लागेल. त्यांना प्रवासाच्या ९६ तास आधी ही   चाचणी करावी लागेल. तर रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची बॉर्डरवरच्या चेकपोस्टवर तपासणी केली जाईल. ज्या लक्षणे असलेल्यांची अँटीजेन चाचणी केली जाईल. प्रवासी पॉझिटिव्ह आढळला तर कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. उपचार खर्च त्यालाच करावा लागेल.

विमान प्रवाशांसाठी नियमावलीविमानतळावर उतरल्यानंतर कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. ही चाचणी प्रवास सुरू करण्याच्या ७२ तासांत केलेली असावी. तपासणी न केलेल्यांना विमानतळावर स्वखर्चाने  तपासणी करून घ्यावी लागेल. त्यासाठी तिथे तपासणी केंद्रे असेल.  तपासणीनंतरच प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. मात्र प्रवाशांना फोन क्रमांक, घराचा पत्ता द्यावा लागेल. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल. 

रेल्वे प्रवासासाठी निर्बंधप्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल सोबत ठेवावा लागेल. ९६ तास आधी तपासणी करणे बंधनकारक आहे.  ज्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट नाही, त्यांना कोरोना लक्षणे जाणवत आहेत का याची पाहणी करण्यात येईल. त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जाईल. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी असेल. कोरोनाची लक्षणं आढळतील त्यांना अँटिजेन टेस्ट करावी लागेल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी मिळेल. 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र