Join us  

प्रवासी विमानांवरील निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेतली खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 1:20 PM

डीजीसीएचा निर्णय; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेतली खबरदारी

मुंबई : भारतातून ये-जा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर १७ महिन्यांपासून हे निर्बंध लागू आहेत.‘डीजीसीए’ने रविवारी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जाहीर केला.

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत कायम राहतील. त्यापुढील निर्णय कोरोनास्थितीनुरूप घेण्यात येईल. मात्र, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बांधनांविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियोजित फेऱ्या मर्यादित स्वरूपात चालविण्यात येतील. त्याचा निर्णय ‘केस टू केस’ तत्त्वावर प्राधिकरणाकडून घेतला जाईल.

तथापि, वंदे भारत अभियान आणि एअर बबल कराराअंतर्गत सुरू असलेली उड्डाणे वेळापत्रकानुसार प्रचलन करतील. सरकारी मापदंडांनुसार पात्र लोक त्या माध्यमातून भारतात ये-जा करू शकतील, असे स्पष्ट केले आहे. भारताने १८हून अधिक देशांशी एअर बबल करार केले असून, त्याअंतर्गत दोन्ही देशांतील प्रमुख विमान कंपन्यांना आठवड्यातून ठराविक दिवस पूर्वनियोजित विमान फेरी चालविण्यास परवानगी देण्यात येते.

निर्बंध न वाढवण्याची होत होती मागणी  

भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध आणखी वाढवू नयेत, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेद्वारे करण्यात आले होते.  मात्र, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि काही देशांत डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढू लागल्याने खबरदारी म्हणून डीजीसीएने हा निर्णय घेतल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. २३ मार्च २०२० पासून हे निर्बंध लागू आहेत.

टॅग्स :विमानभारत