‘मेयर राज’ची पुनर्स्थापना; मुंबईत महायुतीचे महापौर-उपमहापौर बसले, नीलम गोऱ्हेंच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:25 IST2026-02-11T16:25:05+5:302026-02-11T16:25:57+5:30
Mumbai BMC Mayor Election: भाजपाच्या रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौरपदी बिनविरोध

‘मेयर राज’ची पुनर्स्थापना; मुंबईत महायुतीचे महापौर-उपमहापौर बसले, नीलम गोऱ्हेंच्या शुभेच्छा
Mumbai BMC Mayor Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेला अखेर आज नवे महापौर लाभले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेनेच्या संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते दोघांनी पदभार स्वीकारला.
महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत विरोधात कोणताही उमेदवार उभा नसल्याने रितू तावडे आणि संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली होती. या निवडीमुळे मुंबईतील प्रशासक राज संपुष्टात येऊन पुन्हा एकदा ‘मेयर राज’ची सुरुवात झाली आहे, असे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
अध्यक्ष सभागृहात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नव्या महापौर व उपमहापौरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले, त्यावेळी भूषण गगराणी आणि महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीमध्ये त्यांनी मुंबई महापालिकेतील विजयाबद्दल अभिनंदन केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आज मुंबईला मराठी महापौर आणि उपमहापौर लाभणे ही अभिमानाची बाब आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा केवळ राजकारणापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून मराठी माणसाला सन्मान आणि संधी देण्याची भूमिका महायुतीने सिद्ध केली आहे. मुंबईच्या सर्वसमावेशक विकासासोबत मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिक स्वाभिमान यांचे जतन करणे ही आमची बांधिलकी आहे.”
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकार व महाराष्ट्राच्या मध्ये ना.श्री . देवेंद्र फडणवीस व ना. एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून रस्ते विकासासह विविध प्रकल्पांमुळे शहराच्या प्रगतीला वेग आला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांचा वाढलेला सहभाग आणि मराठी भाषेच्या प्रश्नावर जनजागृती यामुळे महायुतीला व्यापक जनसमर्थन मिळाले आहे.
महापौर रितू तावडे यांनी आपल्या भाषणात महिलांचे प्रश्न, मराठी भाषा व मराठी शाळांचे संवर्धन, मुंबईची सुरक्षितता तसेच बेकायदेशीर घुसखोरीच्या प्रश्नावर ठोस भूमिका मांडली ती स्वागतार्ह आहे. उपमहापौर म्हणून संजय घाडी यांच्यासारखे आक्रमक व क्रियाशील नेतृत्व लाभल्याने प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मनपा सभागृहात उपसभापती या नात्याने महापौर मा. रितुताई तावडे व मा. श्री. संजय घाडी यांचा मनःपूर्वक सत्कार केला. माध्यमांशी बोलतांना नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतील विजयाबद्दल देवाचे व जनतेचे आभार मानले.