Join us

मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 09:05 IST

लोकल वाहतूक ही मुंबईची लाइफलाइन. मुंबईकरांचा रोजचा रेल्वे प्रवास वेळेवर व्हावा, यासाठी येत्या वर्षात प्रयत्न केले जातील. शिवाय अन्य प्रकल्पही वर्ष-दोन वर्षांत मार्गी लागतील. 

रजनीश गोयल, मुंबई विभाग व्यवस्थापक, मध्य रेल्वे

बाहेरगावाहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या थंडीत उशिराने येतात. त्याचा फटका लोकल वाहतुकीला बसतो. मुंबईत साखळी ओढण्याचे प्रमाण जास्त आहे. कारवाई करूनही ते घटलेले नाही. एका गाडीत जरी साखळी ओढली गेली, तर मागच्या सात-आठ फेऱ्यांना उशीर होतो. रूळ ओलांडताना होणारे अपघात हेही उशिराचे कारण आहे. पादचारी पूल असूनही रूळ ओलांडले जातात. अपघात झाल्यास वाहतुकीवर परिणाम होतो. दिवा स्थानकात हे प्रमाण जास्त आहे. नवीन वर्षात गाड्या वेळेवर चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील.  

येत्या एक ते दीड महिन्यात उरणपर्यंत थेट लोकल सुरू होईल. तेव्हा खारकोपरपर्यंत जाणाऱ्या लोकलच उरणपर्यंत जातील. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल. परिणामी, सध्याच्या फेऱ्यांत जास्त वाढ होणार नाही. हळूहळू किती फेऱ्यांची गरज आहे, त्याचा अंदाज येईल. अतिरिक्त गाड्या आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाचवी- सहावी मार्गिका विद्याविहारहून परळपर्यंत आणण्यासाठी सायन आणि धारावी उड्डाणपुलाचा अडथळा आहे. ते तोडल्यावरच हा प्रकल्प मार्गी लागेल. उर्वरित काम सुरु आहे. मार्च २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. पण जोपर्यंत सीएसएमटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग टाकला जात नाही, तोवर त्याचा पूर्ण फायदा होणार नाही. कल्याण यार्डाच्या रिमोल्डिंगचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत अतिरिक्त लोकल चालविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही. सध्या जादा गाड्यांसाठी कल्याण स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. पनवेल-रोहादरम्यान लोकलसाठी आमच्याकडे विनंती आली आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या मध्य रेल्वेकडे जादा एसी गाडी नाही. एक गाडी  येण्याच्या मार्गावर आहे. ती आल्यावर काही सेवा वाढविल्या जातील. जास्तीत जास्त प्रवाशांना सुविधा मिळेल, अशा मार्गावर ही गाडी चालविली जाईल.

... तर मुंबई चालणार कशी?

- लोकल, मेल-एक्स्प्रेससोबत मालगाड्याही गाड्याही चालविणे गरजेचे आहे. जर असे म्हटले, की आम्ही सर्व प्रवासी गाड्या चालवू. तर मुंबईत कोळसा येणार नाही, स्टील येणार नाही, खाद्यपदार्थ येणार नाहीत.

- एकीकडे लोकल वेळेत चालतील. पण संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल त्यामुळे प्रवासी वाहतुकीसोबत रेल्वेवर मालवाहतूकही गरजेची आहे. त्यादृष्टीने याेग्य ते नियाेजन सुरू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई